गाडय़ांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न, चप्पलफेक
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे रविवारी विमानाने बेळगावला आले आहेत. सीडी प्रकरणावरून सध्या माजी मंत्री रमेश जारकीहोळी व डीकेशी यांच्यात संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जारकीहोळी समर्थकांनी विमानतळाबाहेर शिवकुमार यांना काळे झेंडे दाखविले. त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर चप्पल फेकण्यात आली व ताफा अडविण्याचा प्रयत्न झाला.
रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सांबरा रोडवर ही घटना घडली. लोकसभेचे उमेदवार सतीश जारकीहोळी हे सोमवारी करीदिनी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी डी. के. शिवकुमार रविवारी बेळगावला आले. त्यांच्या षड्यंत्रामुळेच रमेश जारकीहोळी अडचणीत आले आहेत, असे आरोप करीत जारकीहोळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
काळे झेंडे दाखवून ‘गो बॅक शिवकुमार’ बरोबरच शिवकुमार मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी जमावाला आवरण्यासाठी पोलिसांना बरीच धडपड करावी लागली. जमावातील काही जणांनी वाहनांच्या ताफ्यावर चप्पल व दगडफेक केली. शिवकुमार यांच्या गनमॅनलाही धक्काबुक्की झाली आहे.
बेंगळूरचा संघर्ष रविवारी बेळगावला शिफ्ट झाला. आम्ही आमची ताकद दाखविली आहे. भविष्यात शिवकुमार यांना बेळगाव जिल्हय़ात प्रवेशबंदी करण्याचा इशारा जारकीहोळी समर्थकांनी दिला. दरम्यान, रविवारी सायंकाळी काँग्रेस भवनमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत प्रकाश हुक्केरी, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, गणेश हुक्केरी, केपीसीसी कार्याध्यक्ष रामलिंगा रेड्डी आदींसह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.









