मुंबई/प्रतिनिधी
पाकिस्तानचा मोठा दहशतवादी कट दिल्लीत उघड झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दोन दहशतवाद्यांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून मोठय़ा प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आली. दरम्यान आज, एटीएस प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत जान मोहम्मद शेख याच्याविषयी धक्कादायक माहिती दिली आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी मुंबईच्या धारावी परिसरामध्ये राहणाऱ्या जान मोहम्मद अली मोहम्मद शेख याला अटक केल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ उडाला. विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करताना “एटीएस झोपली होती का?” असा सवाल केला असताना आता खुद्द एटीएस प्रमुखांनीच आज पत्रकार परिषद घेऊन त्याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी जान मोहम्मद शेखचे २० वर्षांपासून दाऊद गँगशी संबंध असल्याचा खुलासा केला आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत एकूण ६ जणांना अटक केली असून त्यापैकी जान मोहम्मद शेख हा मुंबईच्या धारावी परिसरात राहणारा होता. त्यामुळे राज्यातील तपास यंत्रणांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यासंदर्भात एटीएस प्रमुख विनीत अगरवाल यांनी पत्रकार परिदेत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.








