डिसेंबरअखेर लसीला परवानगी शक्य
पुणे / प्रतिनिधी
सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या सहकार्याने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक कोविशील्ड या लसीला केंद्राकडून डिसेंबरअखेर परवानगी मिळेल. त्यानंतर जानेवारीत लसीकरणाला सुरुवात होईल, असे स्पष्ट संकेत सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी रविवारी येथे दिले.
सिरमने आपत्कालीन लसीकरण करण्यासाठी दिल्लीतील औषध महानियंत्रक कार्यालयाकडे 6 डिसेंबरला अर्ज केला आहे. त्याला अद्याप परवानगी मिळणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवर पूनावाला यांनी एका चर्चासत्रात ही माहिती दिली. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, चालू महिन्याच्या अखेरपर्यंत तातडीचा परवाना मिळाला, तरी लसीचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यासाठीची परवानगी नंतर मिळेल. महानियंत्रक यांची परवानगी मिळाली, तर भारताचा कोरोना लसीकरण कार्यक्रम जानेवारी 2021 मध्ये सुरू होऊ शकतो.
केंद्र सरकारचा पुढच्या वषी जुलैपर्यंत लसीचे 30 ते 40 कोटी डोस खरेदी करण्याचा मानस आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची 20 ते 30 टक्के लोकसंख्येला कोरोनाच्या लसीचा डोस देण्याची योजना आहे. पुढच्या वषी ऑक्टोबरपर्यंत देशातील एकूण लोकसंख्येपैकी एका मोठय़ा वर्गाला कोरोना लसीचा डोस देण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. हे पाहता खासगी क्षेत्राला पुरतील एवढय़ा डोसची निर्मिती करण्याची तयारी सिरम करीत आहे. पुढील वषी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक नागरिकाला पुरण्याएवढय़ा लसी सिरमकडून उपलब्ध होतील आणि सर्वसामान्यांचे नेहमीचे जीवन सुरळीतपणे सुरू होईल, असा विश्वासही पूनावाला यांनी व्यक्त केला.
अंतिम टप्प्याकडे वाटचाल
सिरमचा कोविशिल्डसाठी ऍस्ट्रेजेनेका-ऑक्सफर्डशी करार झाला आहे. सध्या कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या लसनिर्मितीत कोविशिल्डच अग्रेसर आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच पुण्यातील सिरम संस्थेला भेट दिली होती. त्यानंतर सर्वांत प्रथम भारतातच या लसीचे वितरण होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे कोरोनाची लस नेमकी कधी येणार, याबाबत देशवासियांमध्ये उत्सुकता आहे. लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी द्यावी, यासाठी ड्रग्ज कंट्रोल ऑफ इंडियाकडे अर्ज केला आहे. याच वर्षाच्या अखेरपर्यंत ही मंजुरी मिळेल आणि पुढील वर्षाच्या पहिल्या महिन्यात कोरोना लसीकरण सुरू होईल, अशी खुशखबर पूनावाला यांनी दिली आहे. त्यामुळे एका महत्त्वाच्या व अंतिम टप्प्याच्या दिशेने देश प्रवास करीत असल्याचे दिसत आहे.








