प्रतिनिधी / गोडोली :
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गाड्या बंद असल्याने खासगी वाहतूक करणारांनी चांगलेच उखळ पांढरे करायला सुरुवात केली आहे. पुणे, मुंबईला जाणाऱ्या नोकरदार, चाकरमान्यांना याचा चांगलाच फटका बसत असून, पुण्याला 300 तर मुंबईला 700 रुपये मोजावे लागत आहे. याबाबत थेट आरटीओ कार्यालयात तक्रारी आल्याने भरारी पथकाने जादा पैसे घेणाऱ्या वाहनांचे परवाने निलंबन आणि दंडात्मक कारवाईच्या कचाटयात काही खासगी वाहनधारक सापडले. एसटी तिकीट दरापेक्षा दीडपट पैसे आकारणी करु शकतात, मात्र त्यापेक्षा जास्त पैसे घेतलेली तक्रार ज्या वाहनाबाबत येईल, त्याचा परवाना रदद करुन अधिक नियमाप्रमाणे कारवाई केली जाणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीच्या माहोलमध्ये संप करुन शासनाला खिंडीत पकडले आहे. याचा फटका सुटटीवरुन पुन्हा पुण्या-मुंबईकडे परत जाणाऱ्या चाकरमान्यासह त्यांच्या कुटुंबाला बसू लागला आहे. लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान भरुन काढण्याच्या इरादयाने खाजगी वाहतूक करणाऱ्याने जादा पैसे घेण्यास सुरुवात केली आहे. पुण्याला 130 दर असताना 300 तर मुंबईला 400 च्या दरम्यान असताना 700 रुपये मोजावे लागत आहेत.
बसस्थानकाला लागूनच प्रवाशी घेतले जात असताना कारवाई होत नसल्याने काही प्रवाशानी थेट उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्याकडे याबाबत तक्रार केली. तात्काळ भरारी पथक पाठवून संबंधित वाहनावर कारवाई करायला सुरुवात झाल्याने खासगी वाहतूकदारांची चांगलीच पळापळी झाली.
…तर परवाना निलंबन
खासगी वाहतूक करण्याचा परवाना देताना दर निश्चित केलेले असतात. एसटीच्या तिकिट दरापेक्षा दीडपट दर घेवू शकतात.सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा गैरफायदा घेण्यात खाजगी वाहनधारकांनी घेवू नये.नियमाप्रमाणे पैसे घ्यावेत.जादा पैसे घेतल्याची तक्रार आल्यास संबंधित वाहनांचा परवाना निलंबत करुन अधिक नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. प्रवाशांनी जादा पैसे मागणी केल्यास आरटीओकडे लेखी तक्रार करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.