संजीव खाडे/कोल्हापूर
पाण्याचा अतिरिक्त, जादा वापर करणाऱ्या पाणी ग्राहकांना आता वाढीव शहर पाणी पाणीपट्टीचा दणका बसणार आहे. शहर पाणी पुरवठा विभागाने घरगुती, व्यावसायिक (बिगर घरगुती) आणि औद्योगिक पाणी दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वीसहजार लिटरपर्यतच्या पहिल्या टप्प्यापर्यंत पाणी वापरणाऱ्यांच्या पाणीपट्टीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. हा प्रस्ताव प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे पाठविण्यात आला असून अंतिम निर्णय त्या घेणार आहेत.
गेल्या आठ वर्षांत कोल्हापूर शहरच्या पाणी दरात एकदाही वाढ झालेली नाही. 28 फेब्रुवारी 2013 रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीपट्टी वाढीस मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार 1 एप्रिल 2013 पासून नवीन वाढीव दराने पाणीपट्टी आकारणी सुरू झाली होती. घरगुती पाणीपट्टीचे तीन टप्प्यात (स्लॅब) दर निश्चित करण्यात आले होते. 0 ते 20 हजार लिटर पाणी वापरासाठी प्रति किलो लिटरला (एकहजार लिटर) 9 रूपये 50 पैसे असा दर, त्यापुढील 20 हजार ते 40 हजार लिटर पाणीवापरासाठी प्रति किलो लिटर 11 रूपये 50 पैसे असा दर तर 40 हजार लिटरहून अधिक पाणी वापरणाऱयांना प्रति किलो लिटर 15 रूपये दर असा दर घरगुती पाणीवापरासाठी निश्चित करण्यात आला. व्यावसायिक (बिगर घरगुती) पाण्याचा प्रति किलो लिटर दर 40 रूपये तर औद्योगिक पाण्याचा दर प्रति किलो लिटर 65 रूपये रूपये करण्यात आला. या तिन्ही प्रकारच्या पाणी दराबरोबर अतिरिक्त सांडपाणी अधिभारही आकारला जातो. गेली आठ वर्षे त्याची अंमलबजाणी सुरू आहे.
महापालिकेपुढे पाणीपट्टीत वाढीशिवाय पर्याय नाही
शहरवासीयांना पाणी पुरवठा करताना दिवसेदिवस महापालिकेवरील आर्थिक ताण वाढ आहे. नदीतून उपसा करून घेतलेल्या पाण्यासाठी (रॉ वॉटर) महापालिकेला दरवर्षी एमएलडीनुसार पाटबंधारे विभागाकडे पैसे भरावे लागतात. पाण्याचा उपसा करणे, त्यावर शुद्धीकरण करणे आदी प्रक्रिया करताना वीजेच्या वापराबरोबरच जंतूनाशकांचा वापर करावा लागतो. दिवसेदिवस ही प्रक्रिया महाग होत चालली आहे. 2013 पर्यंत दरवर्षी पाणी उपसा केल्याबद्दल महापालिका पाटबंधारे विभागाला चार कोटी रूपये देत होती. पण त्यात दुपटीने वाढ झाली आहे. त्याचबरोबर वीजबिलही भरमसाठ वाढले आहे. उपसा आणि जलशुद्धीकरण केंद्रांतील यंत्रणेची देखभाल, दुरूस्ती खर्चही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पाणीदरात वाढ करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्याच बरोबर 2020-2021 या संपत आलेल्या आर्थिक वर्षात कोरोनामुळे 50 ते 60 टक्के पाणीपट्टी वसुली झाली आहे. वसुलीत झालेली घटही चिंताजनक आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने गोरगरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांवर आर्थिक ताण पडू नये याची दक्षता घेत जादा पाणी वापरणाऱयांकडून जादा पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रस्ताव प्रशासकांकडे पाठविला आहे.
नवीन पाणीदरवाढीचा प्रस्ताव
घरगुती पाणी
पाणी वापर टप्पा सध्याचा दर दर वाढीचा प्रस्ताव
0 ते 20 हजार लिटर 9रूपये 50 पैसे दरवाढ नाही
20 हजार ते 40 हजार लिटर 11 रूपये 50 पैसे 10 टक्के
40 हजार लिटरपेक्षा अधिक 15 रूपये 20 टक्के
व्यावसायिक पाणी 40 रूपये 15 टक्के
औद्योगिक पाणी 65 रूपये 15 टक्के
(व्यावसायिक व औद्योगिक पाण्याचे वरील दर प्रति किलो लिटरचे आहेत)
दोन महिन्यांचे बिल, सांडपाणी अधिभार
महापालिका दोन महिन्यांचे पाणीबिल देत असते. ते भरण्यासाठी पाणीग्राहकाला एक महिन्याची मुदत असते. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक पाणीपट्टीबरोबर एसटीपी प्रकल्पासाठी (सांडपाणी प्रक्रिया केंद्र) सांडपाणी अधिभारही पाणीबिलातून आकारण्यात येतो. तो दहा ते पस्तीस टक्के असतो. नवीन दरवाढीत हा अधिभारात कोणतीही वाढ सूचविण्यात आलेली नाही.









