मुंबई \ ऑनलाईन टीम
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध ठरवत येत्या सहा आठवड्यात त्यांनी सर्व प्रमाणपत्रे जमा करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या निकालावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवनीत राणा म्हणाल्या की, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा जात आरक्षण प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाचा मी आदर करते. माझा कोणावरही आरोप नाही. पण ज्या पद्धतीने न्यायालयाचा अचानकपणे निकाल येतो त्यानुसार काही तरी नक्कीच पडद्याआड राजकीय खिचडी शिजली असल्याची शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मी गेल्या ९ वर्षांपासून शिवसेनेविरोधात लढा देत आहे. महिलेला खूप परिश्रम करावे लागतात. ते मी गेल्या ९ वर्षापासून केले आहेत. त्यामुळेच मी या संपुर्ण जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या विषयात सर्वोच्च न्यायालयात लढा देणार आहे. शिवसेनेविरोधता माझा लढा मी कायम ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आनंदराव अडसूळ हे अति उत्साहित होऊन निकालानंतर प्रतिक्रिया देत सुटले आहेत. त्यांनी थोडा संयम बाळगावा ते ज्येष्ठ नेते आहेत. न्यायालयाने जी मुदत दिली आहे त्या मुदतीत पुढचं कायदेशीर पाऊल उचलणार, असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं.