बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात विधानसभेच्या दोन आणि विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकीमुळे राज्यात राजकारण तापले आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मी चार दशकांपासून राजकारणात सक्रिय आहे पण मी जातीवर केंद्रित राजकारण कधीच केले नाही.
मी कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचा अध्यक्ष असल्याने कॉंग्रेस आता माझी जात आहे असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवकुमार यांनी शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला आहे परंतु मी या समाजाचा कधीही राजकारणासाठी उपयोग केला नाही. निवडणुकीच्या वेळी एक राजकारणी इतर पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतो. यात काहीही चूक नाही, असे ते म्हणाले.
एचडी कुमारस्वामी हे विसरले असतील की जनता दल सत्तेत असताना कॉंग्रेसचे अनेक नेतेही पक्षात सहभागी झाले होते. नेत्यांचा पक्ष बदलणे हा राजकारणाचा एक भाग आहे. हे जातीवर आधारित राजकारणाशी जोडणे योग्य नाही.