पितृपंधरवडा पाळण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून भारतात चालत आलेली आहे. महाभारत काळापासून याचा उल्लेख आढळतो. आजतागायत ही परंपरा पाळली जाते. श्राद्ध म्हणजे श्रद्धया यत् क्रियते। श्रद्धेने केलेली क्रिया. श्रद्धेने पितरांना जे समर्पित केले जाते ते श्राद्ध. पितृऋणातून मुक्त होण्यासाठी काही अंशी हा प्रयत्न असतो. आयु: प्रजाम् धनं विद्यां स्वर्गम् मोक्षम् …इ. ते देतात अशी भावना असते. राज्यही पितृकृपेने मिळते अशी कल्पना होती. एकप्रकारे पितरांबद्दलची क़ृतज्ञता व्यक्त करण्याचाच हा प्रघात. पण हे सारे करताना काही वेळा विरोधाभास पहायला मिळतात.
एखाद्या माणसाच्या घरी जिवंतपणी इतके हाल होतात, अपमान होतो की, त्याला जिणे नकोसे होते. तो मेल्यावर मात्र त्याचे भूत मानेवर बसू नये म्हणून पिंडदान करतात. त्याच्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मृत्यू अटळच आहे. जन्माला आलेला माणूस मृत्यू पावणार असतो. गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात…जातस्य हि धृवो मृत्युर्धुवं जन्म मृतस्य च। तस्मादपरिहार्येर्थे न त्वं शोचितुमर्हसि।।
अर्थ:-अर्जुना, जन्मलेल्याला मृत्यू आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून अपरिहार्य गोष्टींसाठी शोक करणे योग्य नाही. कोणताही प्राणी जन्माला येतो तो बरोबर मृत्यूला घेऊनच. मृत्यू इतका अटळ आहे, तरी माणूस त्याबद्दल विचार करीत नाही. महाभारतात युधि÷िराला यक्षाने प्रश्न विचारला की, ‘जगातील आश्चर्य कोणते?’ युधि÷िर म्हणाला, ‘माणसे मरताना माणूस पाहतो, पण आपण मात्र अमर व्हावे असे त्याला वाटते.’
अनेकांना खांदे देऊन स्मशानात पोचवणारे एक दिवस आपल्यालाही मृत्यू येणार आहे हे जाणत नाहीत. भर्तृहरि म्हणतो, ‘आम्हाला जन्म देणारे माता पिता गेले. ज्याच्याबरोबर आम्ही लहानाचे मोठे झालो, ते सखे मित्र गेले. आम्ही नदीच्या मातीच्या काठाप्रमाणे झिजत आहोत. आम्ही प्रतिदिन हळूहळू मृत्यूकडे वाटचाल करीत आहोत. आमचा मृत्यू निश्चित आहे.’ असे जरी असले तरी जिवंतपणी आपले आयुष्य सदाचरणात घालवावे, आपल्यामुळे आपल्याप्रमाणेच दुसऱयाचे, समाजाचे राष्ट्राचे हित होईल असे क़ृत्य केले तर तुम्ही मेल्यावरही लोक तुमची आठवण काढतील. असे काही तरी करा जेणेकरून पुढे कोणताही जन्म नको, अपुऱया इच्छा नकोत. आहे त्यातच समाधान मानून रहावे.
आपले मिळालेले जीवन अनमोल आहे, तेच सार्थकतेने जगणे म्हणजे स्वर्ग. निरीच्छपणे जगले की, मोक्ष आपोआपच मिळणार. माणसाला जन्म जसा मंगलदायक वाटतो, तसा मृत्यूही वाटला पाहिजे.
म्हणूनच एका कवीने म्हटले आहे,
अनायासे न मरणं विना दैन्येन जीवितम्।








