जैन मुनी पावनसागर महाराज यांचे प्रतिपादन, कोल्हापूर दौऱ्यात भाविकांना मार्गदर्शन
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या संकटाचा धैर्याने सामना करत असताना आपल्या देशाला परकीयशक्ती आणि अंतर्गंत शक्तींपासून धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी कणखर नेता म्हणून निर्णय घेत आहेत. संकटाच्या या काळात सर्वांनी आपल्या जाती, धर्म बाजूला ठेवून देशहितासाठी एकत्रित येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन परमपूज्य संतशिरोमणी आचार्य श्री 1008 श्री विद्यासागरजी महाराज यांचे परमशिष्य परमपूज्य श्री 108 पावनसागर महाराज यांनी केले.
पावनसागर महाराज सध्या कोल्हापूर दौऱयावर आहेत. त्यांनी शहरातील विविध जैन मंदिरांना भेटी दिल्या. तसेच भाविकांनाही दर्शन देत मार्गदर्शन केले. पापाची तिकटी येथील जैन श्रावक सचिन मादनाईक, सौ. रेश्मा मादनाईक यांच्या घरी ते आहार घेण्यासाठी आले होते. त्यावेळी `तरुण भारत’शी बोलताना त्यांनी आपले स्पष्ट आणि परखड विचार मांडले. ते म्हणाले, कोरोनाच्या महामारीने जगण्याचे संदर्भ बदलले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबत आहेत.
नागरिकांचे प्राण वाचवित आहेत. कोरोनाच्या लसीकरणाची मोहीमही वेगवान केली आहे. या मोहिमेवर काही जण टीका करताना दिसतात, पण आपण सर्वांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे की, अमेरिकेची लोकसंख्या 32 कोटी आहे तर आपल्या उत्तर प्रदेशची लोकसंख्या 25 कोटीच्या आसपास आहे. तरीही अमेरिकेत शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. या उलट 130 कोटींच्या आपल्या देशात 25 टक्के लसीकरण झाले आहे, ही बाब निश्चितच उल्लेखनीय आहे. डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे. संकट काळात टीका करण्यापेक्षा सकारात्मक कृती आवश्यक असते. ती सुरू आहे. त्याचा लाभ देशाला होईल.
जात, धर्म, पंथापेक्षा देशहित महत्वाचे
जात, धर्म, पंथापेक्षा आपला देश मोठा आहे, महत्वाचा आहे. देशाच्या हितापुढे कोणताही धर्म मोठा नाही. त्यामुळे सर्वांनी जात, धर्म बाजूला ठेवून एकत्रित येण्याची गरज आहे. हिंदू असोत, जैन असोत, बौद्ध असोत वा शिख असोत, सर्वांनी देशहितासाठी एकजूट होणे गरजेचे आहे. आपल्या देशाला परकीय शक्तींबरोबरच अंतर्गंत देशविघातक शक्तीपासूनही धोका आहे. त्यांच्या पासून देशाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्व देशावासीयांची आहे, असे सांगत पावनसागर महाराज यांनी राष्ट्रवादाचा मंत्र दिला.
35 वर्षांनी कोल्हापूरला आगमन
कानदवाडी या मिरज शहरालगतच्या गावात जन्मलेले जयपाल पारिसा खोत यांनी वयाच्या 19 व्या वर्षी जैन धर्माची दीक्षा घेतली. जैनत्वाचा सकल, संपूर्ण अभ्यास केल्यानंतर गेली अनेक वर्षे ते प्रवचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत. देशातील विविध राज्यात त्यांची राष्ट्रवादी विचाराची प्रवचने झाली आहेत. परखडपणे आपले विचार मांडणारे मुनी म्हणून पावनसागर महाराज यांची ओळख आहे. दीक्षा घेतल्यानंतर देशभ्रमण करत तब्बल 35 वर्षांनी आपल्या भागात (सांगली, कोल्हापूर) आगमन झाले आहे.