वंचित बहुजनचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
प्रतिनिधी / ओरोस:
शेतकऱयासाठी अहितकारक कायदे असणारे शेतकरी विधेयक रद्द करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी मार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वंचित बहुजन आघाडीने या विरोधात जिल्हाधिकार्यालय समोर धरणे आंदोलन छेडले.
केंद्र शासनाने नव्याने पारित केलेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकऱयांनी एल्गार पुकारला आहे. दिल्ली येथे मागील दोन महिन्यांपासून आंदोलन उभारण्यात आले असून या आंदोलनात आतापर्यंत 157 शेतकऱयांनी जीव गमावला आहे. 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना शेतकऱयांच्या मागणीकडे व आंदोलनाकडे होणारे दुर्लक्ष अयोग्य असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हंटले आहे. शेतकरी विधेयकाच्या अनुषंगाने बनविण्यात आलेले कायदे हे पैसेवाल्यांच्या बाजूचे असून त्यांनाच त्याचा फायदा होण्यावर केंद्र शासनाने भर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रमोद कासले, भावना कदम यांच्यासह अन्य शेतकरी बांधव सहभागी झाले होते.









