दुचाकीवर एक तर कारमध्ये ड्रायव्हरसह दोघेच : पोलिसांची राज्यभर मोठय़ा प्रमाणात कारवाई : लोकांना त्रास झाल्याने प्रचंड संताप
प्रतिनिधी / पणजी
दुचाकीवर मागे कोणी बसायचे नाही. कारमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त केवळ एकाच व्यक्तीला बसायला परवानगी. या अटींमुळे नागरिकांची राज्यात काल सोमवारी प्रचंड धांदल उडाली. पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात नाक्या-नाक्यांवर गाडय़ा उडविल्या व मोठय़ा प्रमाणात दंड ठोकण्यात आला. यामुळे जनता संतप्त बनली असून हा जाचक निर्णय त्वरित मागे घ्यावा, असा इशारा राज्यातील सर्वसामान्य जनतेने दिला आहे.
गोवा सरकारने सोमवारी दि. 20 एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आणि सरकारी कार्यालये खुली केली, मात्र बाजारपेठा बंदच राहिल्या. राज्यातील रस्त्यांवर बऱयाच प्रमाणात खासगी वाहने फिरू लागली. तथापि, सरकारी, निम सरकारी कार्यालये, बँका, क्रेडिट सोसायटी, उद्योग क्षेत्र व इतर व्यावसायिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱया कर्मचारीवर्गाला पणजी, फोंडा, म्हापसा, मडगाव, वास्को इत्यादी शहरांबरोबरच इतर औद्योगिक वसाहतींमध्ये कामाला जाताना राज्य सरकारने ज्या जाचक अटी लादल्या त्यातून कर्मचारीवर्गाची धांदल उडाली व प्रचंड गोंधळ झाला.
जाचक अटींमुळे लोकांना मनस्ताप
स्कूटर वा मोटरसायकल या दुचाकी वाहनांवर एकाच व्यक्तीने बसायचे, दुसऱयाने बसायचे नाही, पतीöपत्नीनेही बसायचे नाही. चारचाकी वाहनांमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त केवळ एक व्यक्ती बसू शकते. इतरांनी बसायचे नाही, अशा अटी लादल्याने कामावर येणाऱया कर्मचाऱयांची धांदल उडाली. लॉकडाऊन कालावधी संपलेला नाही. परंतु, या अगोदर सेवेत हजर रहायला मिळते, याचा आनंद देखील कर्मचारीवर्गाला घेता आला नाही. पोलिसांना सरकारचे आदेश मिळताच सर्रास सर्व नाक्यांवर जनतेच्या गाडय़ा अडविल्या आणि त्यांना दंड ठोठावण्यास प्रारंभ केला. त्यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्या दरम्यान अनेक ठिकाणी जोरदार बाचाबाची झाली.
उतरुन चालत जाण्यास पाडले भाग
क्रेडिट सोसायटय़ा असो वा औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱया छोटय़ा कर्मचारीवर्गाला स्वतःचे वाहन नसेल तर दुसऱयांच्या वाहनांची मदत घेऊन हजर राहावे लागते. मात्र एका गाडीत आणखी माणसे घेता येत नाही हे कारण दाखवून अनेकांना कोणी गाडीत घेतले नाही. पोलिसांना आदेश मिळाल्यानंतर पती आणि पत्नी दोघेही दुचाकी वाहनावर बसलेले त्यापैकी एकाला खाली उतरा असेच आदेश देऊन काहीजणांना तर पायी चालत जाण्यास भाग पाडले.
जनतेमध्ये निर्माण झाला प्रचंड संताप
पणजीमध्ये प्रवेश करतानाच सकाळी मांडवी पुलाखाली पेट्रोल पंपानजीक सर्वच वाहने अडविण्यात आल्यामुळे वाहनांची सुमारे पाऊण कि.मी.ची रांग दिसून आली. त्यातील अनेक दुचाकीस्वारांना दंड ठोठवण्यात आला. चारचाकी वाहनात कुटुंबातले आणखी कोणी व्यक्ती बसता कामा नये वा अन्य कोणीही असो. केवळ पाठिमागे एकच व्यक्ती बसता येईल. या जाचक अटीचा परिणाम म्हणून अनेकांना सेवेवर हजर राहता आले नाही. यासर्व प्रकारामुळे जनता सोमवारी प्रचंड संतप्त झाली. घरातल्या मंडळींना देखील एका गाडीतून सेवेवर जाण्यास बंदी घालण्याचा हा प्रकार झाला. या निर्णयात सरकाने त्वरित बदल केल्यास अनेक प्रश्न सुटतील.
निर्णय त्वरित मागे घ्यावा – मंत्री लोबो
विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री मायकल लोबो यांनी झालेल्या प्रकाराबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. सरकारने असे निर्णय घेऊन जनतेच्या अडचणी वाढविल्या आहेत. आपण या संदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन ही जाचक अट काढून घ्यावी, अशी मागणी करणार आहे. एका घरातील दोन-तीन व्यक्ती बसण्यास कोणतीच हरकत नसावी. सरकारने ही जाचक अट त्वरित रद्द करावी, असे ते म्हणाले.









