राजपत्राच्या प्रत जाळून केला निषेध
प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र सरकारने जो कृषी सुधारणा कायदा केला आहे त्यामध्ये शेतकऱयांच्या विरोधात काही जाचक कायदे सामील करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत येणार आहे. त्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. शनिवारी पुन्हा संपूर्ण देशामध्ये केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यामुळे येथील शेतकऱयांनीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजपत्राच्या प्रतचे दहन करून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदविला.
कोरोनाचे नियम पाळत शेतकऱयांनी केंद्र सरकारविरोधात हे आंदोलन केले. केंद्र सरकारने केलेले कायदे तातडीने रद्द करावेत. अन्यथा यापुढेही आम्ही आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा यावेळी देण्यात आला. दिल्लीतील अखिल भारत संयुक्त किसान मोर्चाने 5 जून हा क्रांती दिन म्हणून पाळावा, असे आवाहन केले होते. त्यानुसार येथील शेतकऱयांनी हे आंदोलन केले.
लोकशाही विरोधात हे कायदे केले आहेत. कृषी सुधारणा कायदा करून बरेच दिवस उलटले आहेत. त्या विरोधात शेतकऱयांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू आहे. मात्र केंद्र सरकार अजूनही कायदा मागे घेण्यास तयार नाही. त्यामुळे आता यापुढेही आम्ही तीव्र आंदोलन करणार, असा इशारा देण्यात आला आहे. कोरोनामुळे केवळ मोजक्मयाच शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडले. यावेळी अखिल भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी, रयत संघटनेचे चुन्नाप्पा पुजेरी, प्रकाश नाईक, राघवेंद्र नाईक आदी उपस्थित होते.









