कित्तूर चन्नम्मा चौकात रास्ता रोको करून केंद्र सरकारचा निषेध : हलगा-मच्छे बायपासला शेतकऱयांचा विरोध
प्रतिनिधी / बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्ता रद्द करावा यासह केंद्र सरकारने अमलात आणलेले जाचक कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्यावतीने बैलगाडी मोर्चा काढून कित्तूर चन्नम्मा चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. जोपर्यंत आपल्या मागण्या केंद्र सरकार मान्य करत नाही. तोपर्यंत वारंवार आम्ही आंदोलन करू, असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी जे तीन कायदे केले आहेत त्यामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसणार आहे. भविष्यात शेतकरी राहणार नाही. तेंव्हा जे जाचक कायदे आहेत ते रद्द करणे काळाची गरज आहे. असे म्हणत कित्तूर चन्नम्मा चौक येथे ठाण मांडून तीव्र निदर्शने करण्यात आली. बैलगाडय़ांसह हा मोर्चा काढण्यात आला. यामुळे या परिसरातील वाहतूक खोळंबली होती.
जिल्हाधिकाऱयांनी स्वीकारले निवेदन
सुपीक जमिनीतून हलगा-मच्छे बायपास हा रस्ता करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी भूमिहीन होणार आहेत. तेंव्हा तो रस्ता रद्द करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे कित्तूर चन्नम्मा चौकात जावून तेथेच निवेदन स्वीकारले. बैलांसह त्या ठिकाणी शेतकरी उपस्थित होते. ऊस बिलेदेखील तातडीने द्यावीत, कर्ज वसुलीसाठी जो तगादा लावण्यात आला आहे तो थांबवावा, विद्युत विभागाचेही खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत, तोही थांबवावा अशा मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे संचालक गणेश इळीगेर, जिल्हाध्यक्ष सत्याप्पा मल्हापुरे, उपाध्यक्ष रमेश मडिवाळ, राजू मरवे, कुबेर गाणगेर, मुत्याप्पा बागण्णावर, रवी पट्टेगार, एस. एम. बिळ्ळूर, महांतेश हिरेमठ, मंजू मरगौडर यांच्यासह बैलहोंगल, कित्तूर, अथणी, चिकोडी, रायबाग, गोकाक यासह इतर परिसरातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शेतकऱयांचा मोर्चा असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह सरदार्स मैदान, कित्तूर चन्नम्मा चौक या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









