वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तिमाहीतील आढाव्यानुसार पाहता तिसऱया तिमाहीत जागतिक स्मार्टफोन्स उत्पादनात 20 टक्के इतकी वाढ झाली आहे. या दरम्यानच्या कालावधीत 33 कोटी स्मार्टफोन्सची निर्मिती करण्यात आली आहे. यात सर्वाधिक उत्पादनाचा वाटा सॅमसंग कंपनीने उचलला आहे. कोरोनाकाळात स्मार्टफोन्सच्या मागणीत लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. ट्रेंडफोर्डच्या अहवालात यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.
सॅमसंगने जुलै-सप्टेंबरच्या कालावधीत 7.8 कोटी स्मार्टफोन्सची निर्मिती केली आहे. पहिल्या तिमाहीच्या तुलनेत पाहता 42 टक्के उत्पादन वाढले आहे.
ट्रेंडफोर्डच्या मते दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगचा एकूण बाजारातील वाटा 23 टक्के इतका होता. सॅमसंगने आपले लक्ष आता उत्तर अमेरिका आणि युरोप या देशातील बाजारांवर केंद्रित केले आहे. आर्थिक प्रोत्साहन धोरण व सवलतीमुळे स्मार्टफोन्स विक्रीत कंपनीला भरघोस यश संपादन करता येत आहे.
योनहाप न्यूज एजन्सीच्या मते सॅमसंग नंतर चिनी कंपनी ओप्पो व शाओमी उत्पादनामध्ये अनुक्रमे दुसऱया आणि तिसऱया क्रमांकावर राहिले आहेत. ओप्पोचा बाजारातील वाटा 13.4 टक्के इतका आहे तर शाओमीचा वाटा 13.2 टक्के आहे. तिसऱया तिमाहीत ओप्पो, वन प्लस, रियलमी यांनी 4.5 कोटी स्मार्टफोन्सचे उत्पादन घेतले आहे. मागच्या तिमाहीपेक्षा उत्पादन 64 टक्के अधिक दिसले आहे. शाओमीने यादरम्यान 4.45 कोटी स्मार्टफोन्सची निर्मिती केली आहे.









