ऑनलाईन टीम / पुणे :
कोविड काळात केंद्रीय स्तरावर आरोग्यविषयक बलस्थाने एकत्र आणणे गरजेचे होते. आयुर्वेदामधील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि अॅलोपॅथीमधील गुंतागुंतीचे उपचार करण्याची क्षमता अशा सगळ्या संकल्पनांचा उपयोग याकाळात होणे आवश्यक आहे. त्यामुळे कोविड काळात आयुर्वेद आणि अॅलोपॅथीला समान पातळीवर आणण्याचे काम झाले. सध्या आयुर्वेद मोठया स्थित्यंतरामधून जात असून कोविड काळात जागतिक स्तरावर आयुर्वेदाचे महत्त्व वाढले आहे, असे मत केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ.भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.
आयुर्वेद टिचर्स असोसिएशनतर्फे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या मान्यतेने अद्ययावत आयुर्वेद या विषयावर तिस-या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा आयुर्वेद टिचर्स असोसिएशनचा जीवनगौरव पुरस्कार पुण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आयुर्वेद शाखेचे माजी अधिष्ठाता डॉ.विजय डोईफोडे आणि सांगलीचे डॉ.श्याम शृंगारे यांना सहकारनगर येथील सातव हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
यावेळी आमदार लहु कानडे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राहुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष डॉ.नितीन चांदुरकर, सचिव डॉ. मनोज चौधरी, डॉ.संदीप जाधव, डॉ.अर्पणा सोले, डॉ.नितीन वाघमारे आदी उपस्थित होते. उत्तम प्रशासक पुरस्कार सहाय्यक आयुष संचालक, पुणे डॉ. व्यंकट धर्माधिकारी आणि एमसीआयएमचे प्रबंधक डॉ.दिलीप वांगे यांना प्रदान करण्यात आला. तसेच आयुर्वेद शैक्षणिक क्षेत्रामध्ये देशभरात कार्यरत प्राध्यापक, संशोधक, चिकित्सक, औषधे कंपनी यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान देखील कार्यक्रमात झाला.
डॉ.भूषण पटवर्धन म्हणाले, कोणत्याही रोगावर नवे उपचार आले असे विनापुरावा किंवा निष्कर्ष न दाखविता त्याबाबतचे खोटे दावे करु नये. आयुर्वेद संकल्पना राबविणा-यांवर आरोप करण्याची संधी आपण इतरांना मिळवून देतो. आयुर्वेदाचे महत्त्व आपण कामातून दाखवू. ब्रिटीश राजवटीमध्ये आयुर्वेद संपविण्याचा प्रयत्न झाला. परंतु आता आयुष आणि आयुर्वेदाला चांगले भविष्य आहे. आयुर्वेद आणि योगाचा झेंडा तरुण पिढी सर्वदूर फडकवित आहे. त्यांना योग्य मार्ग दाखविण्याचे काम आयुर्वेद शिक्षकांनी करायला हवे.
जयंत आसगावकर म्हणाले, कोविड काळात आयुर्वेद डॉक्टरांचे काम कौतुकास्पद होते. डॉक्टरांना घडविण्याचे काम या डॉक्टर्स शिक्षकांनी केले आहे. आयुर्वेदामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोविडचा प्रसार कमी प्रमाणात झाला. लहु कानडे म्हणाले, ब्रिटीशांनी आपल्या संस्कृती व परंपरा तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी खेडयापाड्यात डॉक्टर्स नव्हते. तरीही आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण आपल्या गोष्टी जतन करुन संस्कृती जपली आहे, असेही त्यांनी सांगितले. डॉ.विहार बिडवई, डॉ.शिल्पा रेवले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.आनंद मादगुंडी यांनी आभार मानले.