सर्वसामान्यपणे डोळय़ांना दृष्टीस न पडणारा कोरोनासारखा विषाणू विज्ञान आणि तंत्रज्ञानाने समृद्ध असणाऱया जगासमोर जीवन जगण्यासाठी जबरदस्त आव्हान निर्माण करील असे कोणी स्वप्नातही पाहिले नव्हते. परंतु आज ही स्थिती कोरोनासारख्या विषाणूने मानवी समाजासमोर आणून त्याच्या जगण्याला नाना संकटांनी घेरलेले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे नानाविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेली युरोपातील राष्ट्रे आज दरदिवशी उद्भवणाऱया मृत्यूच्या भयाण तांडवासमोर हतबल झालेली पहायला मिळत आहेत. दुसऱया महायुद्धानंतर जागतिक क्षितिजावर निर्विवाद महासत्ताधीशांच्या आवेशात वावरणाऱया अमेरिकेसारख्या राष्ट्राची परिस्थिती कोरोना विषाणूने केविलवाणी करून टाकलेली आहे. दरदिवशी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची शिकार होणाऱयांची संख्या लक्षणीय होत असताना, ती रोखणे अमेरिकेला सध्यातरी शक्य झालेले नाही. चीन राष्ट्राच्या ज्या वुहान प्रांतातून कोरोना विषाणूचे संकट जगभर हा हा म्हणता पसरले, तेथे 76 दिवसांच्या पुकारलेल्या लॉकडाऊनने परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास मदत केलेली आहे. वुहान प्रांतातून जगाच्या विविध राष्ट्रात पोहोचलेल्या कोरोना विषाणूने 5 जानेवारी 2020 रोजी नेपाळातील व्यक्ती मृत्यूमुखी पडली आणि अल्पावधीत हा विषाणू आज सुमारे 190 राष्ट्रात पोहोचून तेथील लोकांचे आरोग्य, सुख, समृद्धी, मनःशांतीचा भंग केलेला आहे.
कोरोना विषाणूच्या संकटाखाली दोन लक्ष लोक मृत्यूशी झुंज देत असून, जगात आज एक लाख वीस हजार लोकांना विषाणूमुळे अकाली निरोप घेणे भाग पडलेले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी विशिष्ट सामाजिक अंतर राखणे आणि कडक नाकाबंदीद्वारे केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे हे पर्याय प्रभावीपणे उपयोगात आणले जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूच्या पसरत असलेल्या संकटाची व्याप्ती ओळखून त्याला 11 मार्च 2020 रोजी महामारी घोषित केले. कोरोना विषाणूच्या संसर्गाने चीनमध्ये जो धुमाकूळ घातला होता, त्याची प्रचिती जगाला फार उशिरा आल्याने, त्यांनी या संकटाला सामोरे जाण्याची तयारी खूप विलंबाने आरंभली आणि त्याचेच दुष्परिणाम म्हणून माणसे एवढय़ा गतीने पटापट मरत असून, युरोपमधील काही देशात त्यांना दफन करण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेली व्यक्ती झपाटय़ाने विषाणूच्या जहरी विळख्यात सापडून मृत्यूमुखी पडत असल्या कारणाने चीनने त्याचा प्रसार आपल्या इतर प्रांतात होऊ नये म्हणून वुहान प्रांताचे अभूतपूर्व लॉकडाऊन केले आणि कोरोनाचे संकट नियंत्रित करण्यात यश संपादन केले आहे. त्यांनी आरंभलेल्या लॉकडाऊनचा कित्ताच कोरोना विषाणूचे संकट नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकतो याची प्रचिती आल्याने आज आपल्या देशाबरोबर फ्रान्स, इटली, न्यूझीलंड, पोलंड, ब्रिटनसारख्या राष्ट्रांनी लॉकडाऊनचे अवलंबन केलेले आहे. हंगेरी राष्ट्राचे प्रधानमंत्री व्हिक्टर ओर्बान यांनी निवडणुका रद्द करून सत्ता आपल्या हाती घेऊन देशात लॉकडाऊनबरोबर अन्य उपाययोजना कडकरित्या राबविलेली आहे.
चीनपाठोपाठ प्रचंड लोकसंख्या असलेला आपला देश योग्यवेळी हाती घेतलेल्या पहिल्या टप्प्यातील 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या उपाययोजनेमुळे कोरोनाच्या मृत्यू तांडवाला रोखण्यात सध्यातरी सफल झालेला आहे. नाना भाषा, पंथ, वंश, जातीजमाती यांनी समृद्ध असलेल्या या लोकशाही देशाची लोकसंख्या विलक्षण गतीने वाढत असताना लॉकडाऊन राबविणे सोपी गोष्ट नव्हती. हातावर पोट असणारी आणि सतत दारिद्रय़ाशी संघर्ष करणारी मजूर मंडळी लॉकडाऊनमुळे अडकून पडलेली असून, त्यामुळे 14 एप्रिल रोजी बांद्रा मुंबई आणि गुजरातमधील सुरत येथे दुसऱया राज्यातील आपापल्या गावी जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करावी म्हणून आवाक्याबाहेर गर्दी करून आवाज उठविण्याचे असफल प्रयत्न केले. लॉकडाऊनमुळे बेघर आणि दरदिवशी मोलमजुरी करून पोट भरणाऱया मंडळींची विलक्षण गोची झालेली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आणखी 19 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करून एकूण हा अवधी तब्बल 40 दिवसांचा केला आहे. भारतासारख्या विकसनशील देशासमोर एवढा मोठा लॉकडाऊनचा अवधी हेच एक मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. त्याचे भयाण चटके आपल्या अर्थव्यवस्थेला प्रदीर्घ काळ सोसावे लागणार आहेत. परंतु येथील लोकांचे जगणे, जीवन सुखी करण्यासाठी लॉकडाऊन यशस्वी करणे महत्त्वाचे ठरलेले आहे. भूक आणि बेरोजगारी यांच्या विळख्यात फसलेल्या लोकांच्या अगतिकेचा गैरफायदा उठवित मोलमजुरी करणाऱयांना रेल्वेस्थानक, बसस्टँड बंद असताना, त्यांना बाहेर आणण्याची चेष्टा आरंभलेली आहे. त्यामुळे आता 19 दिवसांसाठी दुसऱया टप्प्यात जे लॉकडाऊन पुकारलेले आहे ते जर सफल झाले नाही तर केवळ कोटय़वधीचे नुकसानच नव्हे तर फार मोठी मनुष्यहानी सोसण्याची पाळी आमच्यावर येणार आहे.
कोरोनामुळे आज 350 च्या आसपास मृत्यूमुखी तर कोरोनाग्रस्तांची संख्या बारा हजाराचा आकडा ओलांडण्यास सिद्ध झालेली आहे. दुसऱया टप्प्यातील लॉकडाऊनसाठी प्रधानमंत्र्यांनी सप्तपदी जाहीर केलेली आहे. त्यात नाना व्याधींनी ग्रस्त वयोवृद्धांची काळजी, सामाजिक अंतर आणि लॉकडाऊनच्या लक्ष्मणरेषेचे पालन तसेच घरगुती मुखवटय़ाचा चेहरा झाकण्यासाठी वापर, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या निर्देशांचे अवलंबन, आरोग्य सेतू ऍपद्वारे इतरांना कोरोनाविषयी सजग करणे, गरीब कुटुंबांची काळजी घेणे, कामगारांच्या रोजगाराची दक्षता घेणे आणि कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असणाऱया डॉक्टर, नर्स, स्वच्छता कामगार आणि पोलीस यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगितले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आंतरराज्य बससेवा, रेल्वे आणि विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. जेथे कोरोना विषाणूचे संकट नियंत्रित झालेले आहे तेथे 20 एप्रिलनंतर काही मुभा देण्याचा विचार केंद्र सरकारने आरंभलेला आहे. राजस्थानातील भिलवाडा येथील लॉकडाऊन आणि सामाजिक अंतर राखण्याच्या कडक अंमलबजावणीमुळे कोरोना विषाणूचे संकट यापूर्वी आटोक्यात आल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे 3 मेपर्यंत असंख्य अडचणींना सामोरे जात आम्हाला लॉकडाऊनचे पालन करणे गरजेचे आहे. भारतासारख्या विलक्षणरितीने विस्तारणाऱया देशाच्या लोकसंख्येला सुदृढ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकडाऊनची उपाययोजना आणखी प्रभावी झाली पाहिजे.








