मालदिवमध्ये उभारणी : जागतिक सर्वोत्कृष्ट दहा रिसॉर्टमध्ये निवड : प्रतीक्षा पहिल्या तीन क्रमांकांची
कुडाळ नेटीव्ह कॉनबॅकच्या माध्यमातून झाली उभारणी : हा तर सिंधुदुर्गला मिळालेला मोठा सन्मान – संजीव कर्पे
पद्माकर वालावलकर / कुडाळ:
बांबू स्ट्रक्चर आणि इंटेरियर्समध्ये काम करणाऱया कुडाळ एमआयडीसी येथील ‘नेटिव्ह कॉनबॅक’ या कंपनीने स्थानिक कारागिर आणि स्थानिक बांबूचा वापर करीत मालदिव देशात उभारलेल्या रिसॉर्टला जगातील सर्वाधिक सुंदर अशा पहिल्या दहा रिसॉर्टमध्ये स्थान मिळाले आहे. आता या दहा रिसॉर्टमधून जगातील सर्वाधिक सुंदर अशा तीन रिसॉर्टची निवड करण्यात येणार असून त्यासाठी जगभरातून वोटिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे.
‘नेटिव्ह कॉनबॅक’ ही कंपनी गेली अनेक वर्षे स्थानिक कारागीर व स्थानिक बांबूचा वापर करीत फर्निचर, स्ट्रक्चर निर्मिती व संशोधनाचे काम करते. त्यामुळे अनेक स्थानिक कामगार व स्थानिक बांबू उत्पादक शेतकऱयांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या कंपनीने आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये काम करीत नावलौकिक मिळविला. आता या कंपनीने ‘जान्स बांबू’ या कंपनीसोबत विविध देशांमध्ये काम सुरू केलं आहे. या अंतर्गत नेटिव्ह कॉनबॅकला ‘हिल्टन’ या जगातील सर्वात मोठय़ा हॉटेल कंपनीच्या मालदिव येथील हॉटेल उभारणीचे काम मिळाले. मिळालेल्या या संधीचे सोने करीत ‘नेटिव्ह कॉनबॅक’ने जिल्हय़ातील स्थानिक कारागीर आणि ‘माणगा’ जातीचा स्थानिक बांबू उपयोगात आणत मालदिव येथे या रिसॉर्टसाठी सर्वोत्कृष्ट वास्तूची निर्मिती केली. आता या वास्तूची म्हणजेच रिसॉर्टची जगातील सर्वोत्कृष्ट दहा रिसॉर्टमध्ये निवड झाली आहे आणि लवकरच या दहा रिसॉर्टमधून सर्वोत्कृष्ट अशा तीन रिसॉर्टची निवड केली जाणार आहे. सिंधुदुर्गच्या दृष्टीने ही अतिशय भुषावह अशी गोष्ट आहे.
आमच्यासाठी ही मोठी उपलब्धी – संजीव कर्पे
नेटिव्ह कॉनबॅकच्या या अचिव्हमेंटबद्दल बोलताना कंपनीचे संस्थापक संजीव कर्पे म्हणाले, या पूर्वी आपण युगांडा या देशातही एका गार्डन स्ट्रक्चरची निर्मिती केली होती. मालदिव येथे अजून दोन मोठी कामे आम्हाला मिळाली असून आमचे कारागिर मालदिवला रवानाही झाले आहेत, असे ते म्हणाले. मालदिवमधील आम्ही बनविलेल्या रिसॉर्टची जगातील पहिल्या दहा रिसॉर्टमध्ये निवड होणे, ही आमच्या दृष्टीने फार मोठी अचिव्हमेंट असल्याचे कर्पे यांनी सांगितले. हे रिसॉर्ट निश्चितपणे पहिल्या तीन क्रमांकांत येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.









