बौद्धिक संपदा संस्थाप्रमुखाची निवडणूक : सिंगापुरचे डेरेन तांग विजयी
वृत्तसंस्था/ जिनिव्हा
जागतिक बौद्धिक संपदा संस्थेच्या (वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन) प्रमुखपदाच्या निवडणुकीत चीनच्या उमेदवार वांग बाइयिंग यांना सिंगापूरच्या डेरेन तांग यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. जगभरातील बौद्धिक संपदेला चालना आणि संरक्षण देणे हे या संघटनेचे कार्य आहे.
डब्ल्यूआयपीओला 2018 मध्ये नव्या स्वामित्वहक्कासाठी जगभरातून सुमारे 2.5 लाख अर्ज प्राप्त झाले होते. संघटनेच्या निवडणुकीत चीनच्या पराभवामागे स्वामित्व हक्क आणि बौद्धिक संपदेच्या क्षेत्रातील त्याचे वाढते वर्चस्व कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
बौद्धिक संपदेच्या अधिकारांच्या चोरीचा आरोप चीनवर वारंवार होत असतो. पॅरिस येथील थिंक टँक इन्स्टिटय़ूट मोंटेंयूनुसार या निवडणुकीत पाश्चिमात्य देशांचे समर्थनप्राप्त डेरेन यांना 55 तर वांग यांना केवळ 28 मते मिळाली आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यापार कार्यालयाने चीनवरील बौद्धिक संपदेच्या चोरीच्या आरोपांप्रकरणी चौकशी केली होती. चीनच्या चोरीमुळे अमेरिकेच्या बौद्धिक संपदा क्षेत्राला वर्षाकाठी सुमारे 600 अब्ज डॉलर्सचे (सुमारे 44 लाख कोटी रुपये) नुकसान होत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले होते.
बौद्धिक संपदा निर्देशांक
आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकातील पहिल्या पाच देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, स्वीडन, फ्रान्स आणि जर्मनी सामील आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकात भारताला 40 वे स्थान मिळाले आहे. मागील वर्षी 50 देशांच्या यादीत भारताला 36 वे स्थान प्राप्त झाले होते. या निर्देशांकात जगातील 53 अर्थव्यवस्थांमधील बौद्धिक संपदेच्या स्थितीचे आकलन केले जाते.









