सेन्सेक्स 383 अंकांनी तेजीत – रिलायन्स, कोटक महिंद्रा बँकसह बजाजमध्ये लिलाव
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील आठवडय़ातील सलगच्या घसरणीच्या प्रवासानंतर पुन्हा एकदा नवीन आठवडय़ात मंगळवारच्या सत्रात भारतीय भांडवली बाजार नव्या उमेदीने झेपावला असल्याने सेन्सेक्समध्ये उत्साहाचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
यामध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विविध टप्प्यांवर आर्थिक घडी सुधारत असल्याचा फायदाही बाजारात उठवला जात असल्याचे संकेत असून यात मुख्य कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँक आणि बजाज फायनान्सच्या समभागात लिलाव झाल्याने व जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरण राहिल्याने सेन्सेक्स 383 अंकांनी मजबूत होत बंद झाला आहे.
दिग्गज समभागांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स मंगळवारी दिवसअखेर 383.21 अंकांच्या मजबूतीसह 0.63 टक्क्यांनी वधारत 61,350.26 वर पोहोचत बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 143 अंकांच्या तेजीसोबत 18,268.40 वर स्थिरावला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीत टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक चार टक्क्यांनी वधारले असून अन्य कंपन्यांमध्ये टायटन, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया आणि टेक महिंद्राचे समभाग लाभात राहिले आहेत. दुसऱया बाजूला इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रिड कॉर्प, हिंदुस्थान युनिलिव्हर, डॉ.रेड्डीज लॅब आणि टीसीएस यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
मंगळवारच्या सत्रात चढउतारचे वातावरण राहिल्याने बाजार लाभासोबत बंद झाला आहे. यामध्ये विविध कारणांपैकी जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरणाचा फायदा भारतीय बाजाराला झाल्याचे दिसून आले आहे. अमेरिकन बाजारातील कंपन्यांचे तिमाहीत अहवाल भक्कम राहिल्याच्या बातमीने बाजारातील कल हा मजबूत स्थितीत राहिल्याचे अभ्यासकांनी यावेळी नमूद केले आहे.
अन्य बाजारांमध्ये आशियातील जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे तेजीत राहिले असून चीनचा शांघाय कम्पोजिट आणि हाँगकाँग हे बाजार मात्र घसरणीसोबत बंद झाले आहेत.
तिमाही निकालांचा प्रभाव
देशातील भांडवली बाजारांवर प्रामुख्याने अमेरिकेसह देशातील विविध कंपन्यांकडून सादर करण्यात आलेल्या तिमाही अहवालाचा सकारात्मक परिणाम सेन्सेक्स व निफ्टीच्या कामगिरीवर झाल्याचा फायदा मंगळवारच्या सत्रात झाला आहे.









