एचडीएफसीची दमदार कामगिरी: सलग चौथ्या दिवशी बाजारात तेजी
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील सकारात्मक संकेताच्या जोरावर आणि खरेदीच्या जोरावर सेन्सेक्सने मंगळवारी 600 अंकांची वाढ दर्शविली तर दुसरीकडे निफ्टीचा निर्देशांक 156 अंक वाढून बंद झाला.
मंगळवारी सलग चौथ्या दिवशी शेअरबाजार तेजी नोंदवत बंद झाला आहे. मंगळवारी दिवसअखेर सेन्सेक्स 600 अंकानी वाढून निर्देशांक 39,574.57 वर बंद झाला तर निफ्टी 156.85 अंकांनी वाढत 11,662.40 वर बंद झाला. सकाळच्या सत्रामध्ये सेन्सेक्सने 300 अंकांच्या तेजीसह चांगली सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे निफ्टीनेही 92 अंकांची वाढ दर्शविली होती. दिवसभराच्या सत्रामध्ये एचडीएफसी 8 टक्के वाढीसह आघाडीवर राहिली. एशियन पेंट्स, इंडसईंड बँक, एचडीएफसी बँक, महिंद्रा आणि महिंद्रा तसेच भारतीय स्टेट बँक यांचे समभाग वाढीसह बंद झाले. दुसरीकडे एनटीपीसी, सनफार्मा आणि टाटा स्टील यांचे समभाग घसरलेले पहायला मिळाले. गेल्या दोन दिवसात सेन्सेक्स 878 अंक आणि निफ्टी 245 अंकांसह मजबूत झाल्याचा पहायला मिळाला. मंगळवारी शेवटच्या काही तासात मोठय़ा प्रमाणात खरेदी पहायला मिळाली.
एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि बजाज फायनान्स यात खरेदीसाठी जोर दिसला. आंतरराष्ट्रीय बाजारात युरोपिय बाजारांनी मंगळवारी तेजीची झलक दाखवली. अमेरिकेतील डो जोन्स, नॅसडॅक आणि एस अँड पी 500 बाजारांनी 1.2 ते 2.3 टक्क्यांची वाढ दर्शविली. याचाही परिणाम भारतीय शेअरबाजारावर सकारात्मक दिसून आला. बँकिंगसह ऑटो, माध्यम, रियॅल्टी आणि खासगी क्षेत्रात खरेदी झाल्याचे पहायला मिळाले. दुसरीकडे ऊर्जा, एफएमसीजी आणि फार्मा कंपन्यांच्या समभागांच्या विक्रीत दबाव दिसून आला. निफ्टीमध्ये टाटा मोटर्स 8 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. ब्रिटानिया इंडस्ट्रिज, कोल इंडिया, विप्रो, हिंडाल्को, टाटा स्टील, आयशर मोटर्स, नेस्ले या कंपन्या तोटय़ात राहिल्या होत्या.








