प्रतिनिधी / सोलापूर
मनुष्याच्या चुकीच्या धोरणामुळेच पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. त्याच्यामुळे निर्माण झालेल्या जागतिक तापमान वाढीचा फटका बसत आहे. चिमण्यांना उष्णता सहन होत नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे असे निरीक्षण ज्ये÷ पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी जागतिक चिमणी दिनानिमित्ताने नोंदवले.
शनिवारी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने तरुण भारत संवाद'ने डॉ. अरविंद कुंभार यांच्याशी बातचीत केली. डॉ. कुंभार पुढे म्हणाले,माणूस इतका गतिमान झाला आहे की त्याला परिसराकडे पाहायला वेळच नाही. माणसाच्या स्वार्थी वृत्तीमुळेच निसर्गाचा ऱहास होत आहे. चिमण्यांची संख्या घटण्याचचे कारणही तेच आहे. पारंपारिक शेती नष्ट झाल्यामुळे चिमण्यांसाठी पुरेसे खाद्य उपलब्ध होत नाही. शेती करण्याचे स्वरूप बदलल्याचा परिणामही चिमण्यांवर होत आहे. त्यांचे प्रमुख खाद्य असलेल्या ज्वारी-बाजरीसह वड, पिंपळ, उंबर यासारख्या झाडे ही कमी झाली आहेत. त्यामुळे चिमण्यांची संख्याही वेगाने कमी होत आहे. एकेकाळी चिमण्यांच्या चिवचिवाटाने दिवसाची सुरुवात व्हायची; परंतु आज चिमण्या विपुल प्रमाणात दिसत नाहीत.’
चिमण्या निसर्गचक्रातील प्रमुख घटक आहेत. त्यांना वाचविण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागणार आहेत. अन्यथा मनुष्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल. चिमण्या निसर्गातील गुरु आहेत. त्यांच्याकडून माणसाने खूप गोष्टी घेतल्या आहेत. मात्र तो आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्मयात आले आहे, असेही डॉ. कुंभार यांनी सांगितले.
संवर्धनासाठी प्रयत्न आवश्यक
चिमणीच्या संवर्धनासाठी वेळीच पावले उचलण्याची गरज आहे. सर्वत्र चिमण्यांची संख्या झपाटÎाने घटत आहे. त्यांचे संरक्षण व्हावे आणि त्यांचा वावर वाढावा यासाठी सर्वांनी चिमणी दिनाचे औचित्य साधून आपल्या परिसरात कृत्रिम घरटी बसवावीत. चिमण्यांसाठी दाणा-पाण्याच्या सोय करावी.
- डॉ. अरविंद कुंभार,
ज्येष्ठ पक्षी अभ्यासक









