वृत्तसंस्था/ बेलग्रेड
जागतिक कुस्ती स्पर्धेत अभिमन्यूने कांस्यपदकासाठीच्या लढतीत प्रवेश करण्यात यश मिळविलेले असले, तरी इतर भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीपटूंसाठी मात्र दिवस निराशाजनक राहिला. अभिमन्यूने ‘रिपेचेज’ मार्गाने 70 किलो वजनी गटाच्या पदकासाठीच्या फेरीत प्रवेश केला. शनिवारी उपांत्यपूर्व फेरीत अभिमन्यूला पराभूत करणाऱ्या अमेरिकेच्या झेन अॅलन रेदरफोर्डने अंतिम फेरीत प्रवेश केल्याने त्याला ही संजीवनी मिळाली.
रिपेचेज फेरीत अभिमन्यूने ताजिकिस्तानच्या मुस्ताफो अखमेदोव्हचा 3-1 असा पराभव करून कांस्यपदकासाठीच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले. त्याचा सामना आर्मेनियाच्या अरमान आंद्रेसियानशी होणार आहे. तथापि, अभिमन्यू 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. कारण 70 किलो विभागाचा ऑलिम्पिक वजन श्रेणीत समावेश नाही. दुसरीकडे, पृथ्वीराजने 92 किलो वजनी गटात पात्रता लढतीत मोल्डोवाच्या इऑन डॅमियनचा 6-4 असा, तर स्लोव्हाकियाच्या एमाक कार्दानोव्हचा उपांत्यपूर्व फेरीत 6-1 असा पराभव केला. मात्र उपांत्यपूर्व फेरीत त्याला जॉर्जियन कुस्तीपटू मिरियानी मैसुरादझेकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागला.
79 किलो बिगरऑलिम्पिक गटात भारताचा अव्वल कुस्तीपटू सचिन मोरने सुऊवातीच्या फेरीत मेक्सिकन राऊल इस्रायल डोमिंगेझचा 8-3 असा पराभव केला, मात्र तटस्थ कुस्तीपटू म्हणून स्पधेंत उतरलेल्या अखमेद उस्मानोव्हकडून त्याला नंतर पराभूत व्हावे लागले. 57 किलो फ्रीस्टाईल गटात अमन सेहरावतने पहिल्या फेरीत मोल्दोवाच्या इगोर चिचिओईविऊद्ध 11-0 असा विजय मिळविला, पण अल्बेनियाच्या झेलीमखान अबाकारोव्हकडून त्याला 0-11 असे पराभूत व्हावे लागले. असे असले, तरी सेहरावतला रिपेचेज मार्गाने कांस्यपदकासाठीच्या फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळू शकते. याशिवाय 74 किलो वजनी गटात नवीनने सुऊवातीच्या फेरीत स्वित्झर्लंडच्या टोबियास पोर्टमनचा 12-6 असा पराभव केला, परंतु पुढील सामन्यात किर्गिस्तानच्या अर्सलान बुडाझापोव्हने त्याला 6-4 असे नमविले.









