डॉ. जयदीप रोकडे यांनी उंचावली मान निवड होणारे देशातील एकमेव संशोधक
औंध / प्रतिनिधी
पोल्ट्री व्यवसायाच्या समस्या आपल्या संशोधनाच्या माध्यमातून सोडवण्यात डॉ. जयदीप रोकडे या सातारकर युवा शास्त्रज्ञाचा मोलाचा वाटा आहे. त्यांचा “कुक्कुटपालनामध्ये होणारा उष्माघात व त्यावरील उपाय” हा शोधनिबंध जगभरातील पोल्ट्री व्यवसायिकांना दिलासा देणारा ठरला आहे. डॉ. रोकडे यांची पॅरिस (फ्रान्स) येथे होणाऱ्या “जागतिक कुक्कुटपालन” परिषदेसाठी युवा संशोधक म्हणून निवड झाली आहे. अशा प्रकारे निवड होणारे भारतातील ते एकमेव संशोधक आहेत. त्यांच्या निवडीने पारगावचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणार आहे.
डॉ. जयदीप जयवंत रोकडे यांचे गांव खटाव तालुक्यातील पारगांव असून आई-वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. शालेय शिक्षण दहिवडी येथे झाले आहे. त्यांनी पशुवैद्यकीय शिक्षण शिरवळ, चेन्नई व बरेली (उत्तर प्रदेश) येथून पूर्ण केले. त्यांनी पी. एचडी मिळवताच कृषी संशोधन सेवा परिक्षेमध्ये यश मिळविले. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या बरेली येथील केंद्रीय पक्षी संशोधन केंद्रात २०१४ मध्ये ते रुजू झाले. या केंद्रात त्यांनी विविध संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या राबविले.
या प्रकल्पात त्यांनी तयार केलेले तंत्रज्ञान देशाच्या विविध प्रदेशांत पोहोचविण्याचे कामही ते करीत असतात. या संशोधन प्रकल्पाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी त्यांनी CARI या संस्थेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना प्रशिक्षितही केले आहे. अशा प्रशिक्षित शेतकऱ्यांची संख्या ७०० पेक्षा जास्त आहे. जास्तीतजास्त लोकांनी कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळावे यासाठीही ते प्रयत्नशील असतात. कुक्कुटपालन व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी या विषयाची सखोल माहिती देणारे प्रोत्साहनपर जनजागृती कार्यक्रम त्यांनी राबविले. दिल्ली, मथुरा, वाराणसी, मोतीहारी, गोवा, बेंगलुरू या मोठ्या शहरांसह देशभरातील विविध शहरांत आयोजित प्रदर्शनांमध्ये त्यांनी सहभाग घेऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले आहे. कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी आवश्यक सल्ला व अचूक मार्गदर्शन करण्यावरही त्यांचा भर असतो.
कुक्कुटपालन करताना पक्ष्यांना होणारा उष्माघात हा आजार शेतकरी, व्यवसायिकांच्या दृष्टीने नुकसानीचा विषय ठरतो. व्यवसायाच्या प्रगतीत हा विषय अडचणीचा ठरत असल्याचे लक्षात घेऊन डॉ. रोकडे यांनी यावर यशस्वी संशोधन केले. “कुक्कुटपालनात उष्माघात व त्यावरील उपाय” हा त्यांचा संशोधन निबंध जगभरात नावाजला गेला असून जगभरातील लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. त्यांच्या या संशोधनावर विविध पुरस्कारांचीही मोहोर उमटली आहे. जागतिकस्तरावही त्यांच्या या शोधनिबंधाची दखल घेण्यात आली असून बिजिंग (चीन), बर्लिन (जर्मनी), डबरोवनिक (क्रोएशिया), क्वालालंपूर (मलेशिया), बँकॉक (थायलंड) इत्यादी देशांत आयोजित परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केला आहे. त्याच्या संशोधनाची दखल घेऊन २०२१मध्ये पॅरिस (फ्रान्स) होणाऱ्या जागतिक कुक्कुटपालन परिषदेत “युवा संशोधक” म्हणून डॉ. रोकडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेत जगभरातील केवळ १६ संशोधक सहभागी होणार आहेत. त्यामध्ये डॉ. जयदीप रोकडे हे एकमेव शास्त्रज्ञ भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
सध्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे कुक्कुटपालन व्यवसायाचेही मोठे नुकसान होत आहे. मात्र, लॉकडाउनच्या काळातही शेतकरी, व्यवसायिकांना दिलासा देण्याचे काम डॉ. रोकडे यांनी केले. टेलिमेडिसीनचा वापर करून त्यांनी अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी, व्यावसायिकांना ऑनलाइन मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचे काम केले. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांसोबतच पशुवैद्यकीय पदवी, पदव्युत्तर व पीएचडीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही ते सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. छोट्या शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग दाखविणाऱ्या कुक्कुटपालन व्यवसायात जास्तीत जास्त लोकांना आत्मनिर्भर बनविणारे संशोधन करण्यात डॉ. जयदीप यांचा मोलाचा वाटा आहे. राष्ट्रीय स्तरापर्यंत कुस्तीत दबदबा निर्माण केलेल्या पारगांवचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यात हा युवा संशोधक यशस्वी ठरला आहे. त्याच्या निवडीमुळे ग्रामस्थांनी आंनद व्यक्त केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








