मात्र नगरसेवकांचा संबंध जोडल्याने नाराजी
प्रतिनिधी /मडगाव
तमाम मडगावकरांचे आराध्य दैवत असलेल्या जांबावली येथील श्री दामोदर (दामबाब) देवस्थानच्या गर्भकुडीची सहा वर्षांनंतर साफ सफाई करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष मंजुनाथ दुकळे यांनी दिली. सद्या देवस्थानच्या प्राकाराची साफ सफाईचे काम सुरू असून हे काम पूर्णत्वाकडे निघाले आहे.
श्री दामोदर देवस्थानच्या समितीची काल रविवारी वार्षिक सर्व साधारण सभा झाली. या सभेला देवस्थानचे महाजन उपस्थित होते. या सभेत देवस्थानच्या साफ-सफाईचा विषय निघाला होता. त्यात महाजनांनी गर्भकुड स्वच्छ करण्याची ईच्छा व्यक्त केली व कालच हे काम हाती घेण्यात आले. तब्बल सहा वर्षानंतर काल गर्भकुड साफ करण्यात आली. गर्भकुड साफ करण्याचे काम हे महाजनां तर्फेचे केले जाते असे श्री. दुकळे म्हणाले.
दरम्यान, मडगाव नगरपालिकेचे 14 नगरसेवकांनी श्री दामोदर देवस्थानात जाऊन नारळावर प्रमाण झाले होते. त्यांचा संदर्भ एका डिजिटल न्यूज चॅनलने नारळावर प्रमाण होण्याशी जोडला. मडगाव पालिकेचे काही नगरसेवक जांबावली देवस्थानात गेले होते. त्यांनी मांसाहार केला होता तसेच दारूच्या नशेत होते. तसेच त्यात काही ख्रिश्चन नगरसेवकांचा समावेश असल्याने देवस्थानचे शुद्धीकरण करण केले जात असल्याचे म्हटले होते. मात्र, या प्रकारांवर तीव नाराजी व्यक्त करण्यात आली.
देवस्थान समितीचे अध्यक्ष मंजुनाथ दुकळे म्हणाले की, श्री दामबाबाच्या दर्शनाला दिवसाला शेकडो भाविक येतात. त्यातील किती जण शुद्ध शाहाकारी असता किंवा किती जणांनी मांसाहार केलाय किंवा किती जणांनी दारू घेतली याचा कोणताच तपशील देवस्थान ठेवत नाही. देवदर्शनाला येणारे भाविक हे देवावर भक्ती असल्यानेच येतात. त्यांच्यावर कोणी बंधन घालू शकत नाही. मुळात जो नगरसेवकांचा संबंध जोडण्यात आलेला आहे तो चुकीचा आहे.
मंदिरात प्रसाद पूजा होत असते, त्यावेळी दुपारी 2.30 ते 5.30 पर्यंत ख्रिश्चन भाविकांसाठी आपली सेवा रूजू करण्याची संधी मिळते. त्यामुळे मंदिरात ख्रिश्चन बांधव आले म्हणून शुद्धीकरण करण्याचा संदर्भ जोडणे कितपत योग्य असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सद्या देवस्थानचा प्राकार व गर्भकुडीची साफ-सफाई करण्यात आलेली आहे. देवस्थानचा प्राकार स्वच्छ करण्यासाठी फातोर्डा आमदार विजय सरदेसाई यांनी खास यंत्र पुरविले होते. त्याद्वारे प्राकार स्वच्छ करण्यात आला तर काल रविवारी देवस्थानच्या महाजनांनी गर्भकुडीची सफाई केली असे श्री. दुकळे म्हणाले.









