प्रतिनिधी / मडगाव
जांबावलीचा गुलालोत्सव दरवर्षी दुपारच्या वेळी व्हायचा. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे तो मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आलाच, त्याच बरोबर तो प्रथच सकाळच्या सत्रात झाला. जांबावली शिगमोत्सवानिमित्त पूजा करण्यात आलेल्या नारळावर देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच मठग्रामस्थ हिंदू सभेच्या पदाधिकाऱयांनी गुलाल अर्पण करून गुलालोत्सव साजरा केला.
दामबाबाच्या गुलालोत्सवात खंड पडू नये यासाठी यंदा मर्यादित स्वरूपात गुलालोत्सव साजरा करण्याचा निर्णय देवस्थान समिती व मठग्रामस्थ हिंदू सभेच्या वतीने संयुक्तरित्या घेतला होता. त्याप्रमाणे शिगमोत्सवाच्या नारळाची पूजा कोंबवाडा-मडगाव येथे करण्यात आली होती. हा नारळ मिरवणुकीने जांबावलीकडे नेण्यात आला होता व त्यानंतर शिशिरोत्सवातील धार्मिक विधींना प्रारंभ झाला होता.
यंदा कोरोना महामारीमुळे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. मात्र, देवस्थानातील इतर सर्व धार्मिक विधी सुरळीतरित्या झाले. काल मंगळवारी सकाळी शिगमोत्सवाच्या नारळावर गुलाल वाहून गुलालोत्सव साजरा करण्यात आला. यंदा श्री दामबाबाची पालखी काढण्यात आली नाही. दरवर्षी पालखीत विराजमान होणाऱया दामबाबावर गुलालाची उधळण करून गुलोलोत्सव साजरा करण्यात येत होता. दामबाबाची पालखीची मिरवणूक सुवारी वादनात निघत होती. त्याच पद्धतीने सुवारी वादनात गुलाल वाहण्यात आलेला नारळ नेण्यात आला.
असंख्य भाविकांनी जांबावलीत जाऊन श्री दामबाबाचे दर्शन घेतले. रात्री उशिरा पर्यंत भाविक जांबावलीकडे जात होते.









