मोदी सरकार आणणार अग्निपथ योजना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात अनेक प्रकारच्या सुधारणा साकारण्याचा दावा करणारे नरेंद्र मोदी सरकार आता सैनिकांच्या भरतीची पद्धत बदलणार आहे. सैन्यात भरतीसाठी ‘अग्निपथ प्रवेश योजना’ सरकार लागू करणार असून याद्वारे सेवेत दाखल होणाऱया सैनिकांना ‘अग्निवीर’ म्हटले जाणार आहे.
अग्निपथ प्रवेश योजनेद्वारे सेवेत सामील होणाऱया अग्निवीरांमध्ये टॉप माईंड्सची सेवा वाढविण्यात येणार आहे. उर्वरित सैनिक केवळ 3 वर्षांच्या सेवेनंतर सैन्यातून हटविले जातील आणि ते नागरी क्षेत्रातील नोकऱयांसाठी प्रयत्न करू शकतील. या अग्निपथ योजनेद्वारे सैन्य बजेटचा मोठा हिस्सा शस्त्रप्रणालीच्या आधुनिकीकरणावर खर्च होईल तर दुसरीकडे देशसेवेसाठी उत्सुक तरुण-तरुणींना स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याची संधीही मिळणार आहे.
3 वर्षांसाठी होणार निवड?
ही अनोखी योजना 2 वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे सैन्यातील भरती थांबल्याने समोर आणली गेल्याचे मानले जात आहे. सरकार आता 3 वर्षांसाठी अग्निवीरांची निवड करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान या अग्निवीरांना विविध क्षेत्रांच्या अवघड आव्हानांना सामोरे जावे लागेल. यात उग्रवादविरोधी मोहीम, गोपनीय माहिती जमविणे आणि माहिती-तंत्रज्ञानाशी निगडित प्रशिक्षण सामील असेल.
लाखाहून अधिक पदे रिक्त
कोरोना महामारीमुळे सैन्यभरतीचे काम ठप्प पडले होते. यामुळे सैन्यात जवानांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. भूदल, नौदल आणि वायुदलाच्या अधिकृत आकडेवारीनुसार सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये सध्या 1,25,364 रिक्त पदे आहेत.
संरक्षण मंत्रालयात विस्तृत चर्चा
संरक्षण मंत्रालयाच्या चालू आठवडय़ातील ब्रीफिंगमध्ये अग्निपथ प्रवेश योजनेची चर्चा झाल्याचे समजते. सैन्यप्रमुख जनरल मनोज मुकंद नरवणे यांनी 2020 मध्ये या योजनेचा प्रस्ताव मांडला होता. परंतु सर्वोच्च नेतृत्त्वाच्या स्तरावर ही योजना अलीकडच्या काळात गांभीर्याने घेतली जात आहे. परंतु योजना कशा स्वरुपात आणली जाईल आणि कुठल्या प्रकारे काम करणार, यासंबंधी विस्तृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. स्थायी सेवेच्या जागी आता छोटय़ा कालावधीच्या कार्यालयासाठीच सैनिकांची भरती केली जाईल, हे आता निश्चित आहे.
कॉर्पोरेट जगतात मिळणार संधी
3 वर्षांच्या सेवेनंतर बहुतांश सैनिकांना सेवामुक्त केले जाईल. परंतु पुढीलकाळात नोकरी मिळविण्यात त्यांना सैन्याकडून मदत मिळणार आहे. याचा सर्वात मोठा पर्याय कंपन्या उपलब्ध करणार आहेत. देशाचे कॉर्पोरेट जगत सेवामुक्त अग्निवीरांना नोकरी देतील. कारण हे अग्निवीर अत्यंत शिस्तबद्ध, कठोर प्रशिक्षणप्राप्त आणि उच्च नैतिकतेने युक्त असणार आहेत.









