जमीनवादातून घरावर हल्ला, जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार
प्रतिनिधी / बेळगाव
बहिष्कार घालण्याच्या घटना या अत्यंत दुर्गम भागामध्ये तसेच पूर्वी घडत होत्या. मात्र, शहरापासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावर असलेल्या गौंडवाड येथे देशसेवा बजावणाऱया जवानाच्या घरावर हल्ला करून त्यांच्या कुटुंबीयांवर बहिष्कार घालण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जवानाने जिल्हाधिकाऱयांकडे आपल्या कुटुंबासह तक्रार नोंदविली असून आमच्या कुटुंबाला संरक्षण द्या, अशी मागणी केली आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून बरीच वर्षे उलटली. भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. असे असताना दीपक मल्लाप्पा पाटील या जवानाच्या कुटुंबावरच बहिष्कार घातल्यामुळे खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून 6 जून रोजी काही जणांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. घरातील साहित्याची मोडतोड याचबरोबर दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. मात्र, हल्ला करणाऱयांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
माझे कुटुंबीय घरातून बाहेर गेले तर त्यांच्याशी बोलायचे नाही. बोलले तर दंड आकारण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. दुकानामध्ये गेल्यानंतरही कोणत्याही वस्तू दिल्या जात नाहीत. मुले दुकानात गेली तर त्यांना माघारी पाठविले जात आहे. 1 डिसेंबर 2020 रोजीही आमच्यावर हल्ला झाला होता. जमिनीच्या वादातून हा प्रकार केला जात आहे. तेव्हा आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जवानाचे कुटुंबीयही उपस्थित होते.
तहसीलदार-पोलीस निरीक्षकांकडून तातडीने पाहणी या जवानाने जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिल्यानंतर तातडीने त्याची दखल घेण्यात आली. तहसीलदार आर. के. कुलकर्णी आणि काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर यांनी गौंडवाड येथे त्या जवानाच्या घरी पाहणी करून त्यांची विचारपूस केली.









