रूग्णवाहिका चालकाकडूनच मागितली लाच : आरोग्य विभागात खळबळ
वार्ताहर / राजापूर
तालुक्यातील जवळेथर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरला आपल्याच दवाखान्यातील रूग्णवाहिका चालकाकडून साडेपाच हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडले. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला असून यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. पुष्पक केरबा भिसे असे पोलिसांच्या जाळय़ात सापडलेल्या वैद्यकीय अधिकाऱयाचे नाव आहे. राजापूर तालुक्यातील जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉ. पुष्पक केरबा भिसे यांनी आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिका चालकाकडे महिन्याचे मानधन व हजेरीपट गटविकास अधिकाऱयांकडे पाठवण्यास साडेपाच हजार रूपयांची मागणी केली होती. या बाबत रूग्णवाहिका चालकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाचलुचपत विभागाने मंगळवारी सापळा लावला होता.
मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास डॉ. भिसे यांना रूग्णवाहिका चालकाकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक रत्नागिरी विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कदम व सहकाऱयांनी केली. एकीकडे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढत असताना जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी लाचलुचपतच्या जाळय़ात सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मागील काही वर्षात तालुक्यात तहसीलदारांसह महसूल विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी, तालुका कृषी विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा एक अधिकारी अशी बडी मंडळी लाच घेताना जाळय़ात अडकली असून त्यामध्ये आता डॉक्टरचीही भर पडली आहे.









