देवेंद्र फडणवीस : कृष्णेचे स्थिरीकरण आवश्यक : पूरग्रस्तांचे पुनर्वसन आवश्यकच
प्रतिनिधी / सांगली
महापूराला जलसंपदा विभागाचा चुकलेला अंदाजच कारणीभूत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे बोलताना केला. कृष्णा नदीचा महापूर टाळायचा असेल तर महापूर काळात पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणे आणि कृष्णेचे स्थिरीकरण करणे हाच पर्याय आहे. जागतिक बँकेनेही हा प्रस्ताव तत्वतः मान्य केला असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले.
कृष्णा नदीच्या महापुराने बाधित झालेल्या पलूस, मिरज तालुक्यातील गावांची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “महापूराच्या पाण्याने नदीकाठच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाली आहे. छोटे दुकानदार, व्यापाऱयांनाही फटका बसला आहे. कोरोना संकटाने शेतकरी, व्यापाऱयांसह सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता महापूराचे संकट उभे आहे. गोरगरीबांची घरे पाण्याखाली होती. त्यामुळे या काळात तातडीने मदत मिळायला हवी. तुम्हाला बँक खात्यात मदत द्यायची आहे तर द्या, मात्र लवकर द्या. दुकाने साफ करायला लोकांना पैसे हवेत. किती काळ मदत लांबवणार आहात.” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ते म्हणाले, “चक्रीवादळानंतर केंद्राने मदत दिली आहे. गुजरातला आधी दिली कारण वादळ जावून गुजरातमध्ये आदळले होते. तेथे अधिक परिणाम असल्याने आधी मदत मिळाली, महाराष्ट्राने नुकसानीचा अहवाल दिल्यानंतर येथेही मदत मिळाली, महापुराची मदतही मिळेल. परंतु केवळ केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही. आम्ही आमचे सरकार असताना केंद्राकडे बोट दाखवत नव्हतो. आमच्या हिंमतीवर पैसे देत होतो. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवर यांनी नसती कारणे सांगून पळवाटा शोधू नयेत, असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी वडेट्टीवार यांचे नाव घेत हाणला. ते म्हणाले, महापूर काळात जलसंपदाचे अंदाज चुकले. त्यांनी सांगितलेली पाणी पातळी गृहित धरून लोक निर्धास्त राहिले, तेथे चूक झाली अशी टिकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.
पूरग्रस्तांचे पुनर्वसन आवश्यकच
पूरपट्ट्यातील नागरी वस्त्यांचे पुनर्वसनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारत्मक भूमिका मांडली होती. त्याला अनुसरुनच फडवणवीस यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, “दरवर्षी नागरी वस्त्या पाण्यात जात असतील तर त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे. पूरग्रस्त भागांचा पाहणी करतानी ढवळीत एक दलीत वस्ती पाहिली, ती पूर्ण पाण्यात होती. हे बरोबर नाही.” असे वारंवार पूराला सामोरे जावे लागत असेल तर पुनर्वसन आवश्यकच आहे.








