प्रतिनिधी/ बेळगाव
जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा याकरीता जलशुद्धीकरण केंदे उभारण्यात आली होती. मात्र सध्या ती पाण्याविना कुचकामी ठरली आहेत. परिणामी शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा झाला आहे. शिवाय जनतेला शुद्ध पाण्यापासून दूर रहावे लागले आहे. ऐन उन्हाळय़ात जल शुद्धीकरण केंद्रात पाणी नसल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
कर्नाटक ग्रामीण मूलभूत सुविधा निगम आणि ग्रामीण पाणीपुरवठा खाते यांच्यामार्फत ग्रामीण भागात जलशुद्धीकरण केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. जिल्हय़ात तब्बल 1448 जलशुद्धीकरण केंद्रांची निर्मिती झाली होती. सुरुवातीच्या काळात जनतेला सुरळीत पाणीपुरवठा झाला होता. मात्र आता जलशुद्धीकरण केंद्रातच पाणी नसल्याने जनतेला पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही योजना बारगळली आहे. परिणामी जनतेला शुद्ध पाण्यापासून दूर रहावे लागले आहे.
जिल्हय़ातील 775 हून अधिक केंदे बंद असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. केंद्रांना पाणीपुरवठा होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान अनेक केंदे नादुरुस्त झाल्याने पाणीसाठा करणे अवघड झाले आहे. सध्या 1478 पैकी केवळ 700 केंदे सुरू आहेत. तर काही केंदे पाण्याअभावी ओस पडली आहेत.
उन्हाळय़ात अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण होते. अशा परिस्थितीत ही जलशुद्धीकरण केंदे आधार ठरली असती. मात्र पाण्याचा अभाव, दुरुस्तीकडे दुर्लक्ष यामुळे बहुतांश जलशुद्धीकरण केंदे कुचकामी ठरली आहेत. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राकडे लक्ष पुरवून सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.
जिल्हय़ातील गोकाक, रामदुर्ग, रायबाग, अथणी, सौंदत्ती, खानापूर, मुडलगी आदी भागात देखील बंद पडलेल्या जलशुद्धीकरण केंद्रांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शासनाने केंदे उभारणीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. अनेक केंद्रांना सुरळीत विद्युतपुरवठा न झाल्याने केंदे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.









