नागरिकांचा प्रश्न ; खडेबाजार येथे गळतीमुळे पाणी वाया
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात पाणीसमस्या गंभीर बनत चालली आहे तर दुसरीकडे शहरातील जलवाहिन्यांना गळती लागून हजारो लीटर पाणी वाया जाण्याचे प्रकार घडत आहेत. गणपत गल्ली, खडेबाजार कॉर्नरवर जलवाहिनीला गळती लागून शेकडो लीटर पाणी वाया जाण्याचा प्रकार घडला. सातत्याने या ठिकाणी गळती लागत असल्याने पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. याबाबत पाणीपुरवठा कंपनीने कानाडोळा केला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
शहरात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने पाण्याविना हाल होत आहेत. मात्र जलवाहिनींना गळती लागून पाणी वाया जात आहे. दुरुस्ती वेळेवर केली जात नसल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. खडेबाजार कॉर्नरवर जलवाहिनीला गळती लागून पाणी वाया गेले आहे. शिवाय रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीलादेखील अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे जलवाहिनीची गळती कायमस्वरूपी थांबवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
गणपत गल्ली, खडेबाजार या रस्त्यांवर पादचारी व वाहनधारकांची सतत ये-जा असते. त्यातच जलवाहिनीला गळती लागल्याने वाहनधारकांना यातूनच मार्ग काढावा लागत आहे. एकीकडे मनपा पाणी वाचवा, असा संदेश देत आहे. तर दुसरीकडे मनपाच्याच पाणीपुरवठा करणाऱया कंपनीकडून जलवाहिनीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने पाणी वाया जात आहे. त्यामुळे मनपाच्या आवाहनाची पाणीपुरवठा कंपनीकडून पायमल्ली होताना दिसत आहे. शहरात वारंवार पाणी वाया जात असल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
शहरात दररोज कुठे ना कुठे पाणी वाया जाताना दिसत आहे. तर दुसरीकडे शहरवासियांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा संस्था काय करते, असा प्रश्नदेखील नागरिकांना पडत आहे.