ऑनलाईन टीम / मुंबई :
देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला ठाकरे सरकारने क्लीन चिट दिली आहे. जलयुक्त शिवारमुळे राज्यातील भूजलपातळी वाढली आहे. पिक पेरणी क्षेत्र आणि उत्पन्नात वाढ झाली असून शेतकऱ्यांच्या राहणीमानाचा दर्जाही सुधारला आहे, असा निष्कर्ष राज्य सरकारच्या जल संधारण विभागाच्या अहवालात काढण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर जलयुक्त शिवार योजनेत तांत्रिक त्रृटी आणि कामात अनियमितता असल्याबाबत आक्षेप घेण्यात आला होता. तसेच या योजनेचे उद्दीष्ट पूर्ण झाले नसल्याचे सांगत कॅटच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आले होते. आता या योजनेतील नागपूर, बुलडाणा, पालघर, अहमदनगर, सोलापूर, बीड या सहा जिह्यांमधील 1 लाख 76 हजार 284 कामांपैकी 58 हजार 738 कामांचे मूल्यमापन करून जलसंधारण विभागाने अहवाल जाहीर केला असून, कॅटचा अहवालातील आक्षेप फेटाळण्यात आले आहेत.
जलसंधारण विभागाने म्हटले आहे की, जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. दोन्ही हंगामामध्ये पाण्याखालील पिकांमध्ये वाढ झाली आहे. कामे झालेल्या ठिकाणी शेतकऱयांनी नगदी पिके घेतलेली असून, त्या ठिकाणच्या शेतपिकांचे उत्पादन वाढलेले आहे. रब्बी पिकांमध्ये पालघर जिह्यात 20 टक्के, सोलापूर 11 टक्के, अहमदनगरमध्ये 11 टक्के, बीड 12 टक्के, बुलडाणा जिह्यात 87 टक्के, तर नागपूर जिह्यात 11 टक्के एवढी वाढ झाली आहे.