प्रतिनिधी/सातारा
साताऱयातील शुक्रवार पेठेत असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर निवास्थानातील शयनकक्ष महालाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवलेली 1 लाख 4 हजार रुपये किंमतीची शोभेची चांदीने मढवलेली बंदूक चोरुन नेल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी वाडय़ात माळी काम करणाऱया दीपक पोपट सुतार (वय 26 रा. माची पेठ, सातारा) याला अटक केली आहे.
याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी सायंकाळी ही चोरीची घटना घडली आहे. जलमंदिरातील शयनकक्षाच्या प्रवेशद्वाराजवळ काचेच्या बॉक्समध्ये ही चांदीने मढवलेली शोभेची बंदूक ठेवलेली होती. कामाच्या निमित्ताने तिथे प्रवेश करुन कामगार दीपक सुतार याने ही बंदूकच चोरुन नेली होती.
ती बंदूक साताऱयातील एका सोने-चांदीच्या व्यावसायिकाकडे तो विक्रीसाठी घेवून जात असल्याची माहिती सातारा शहर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संजू गुसिंगे यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी कारवाई करत
दीपक सुतार याला अटक केली आहे. ही बंदूक कुठून आणली, अशी चौकशी आरोपी दीपककडे केल्यानंतर त्याने सुरुवातीला माझ्या एका मित्राने दिली असल्याचे सांगितले, मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला.
संशयित आरोपीची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे दोन फूट लांब, अंदाजे दीड किलो वजन असलेली चांदीची बंदूक आढळून आली. आरोपची अधिक चौकशी केली असता त्याने ही दोन किलोची चांदीची शोभेची बंदूक खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानातून चोरली असल्याची कबुली दिली. त्याच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलमंदीर पॅलेस याठिकाणी माळी कामासाठी आलेल्या कामगाराने ही चोरी केल्याची बाब समोर आली. या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस नाईक फडतरे करत आहेत.








