जलप्रलयाच्या तडाडाख्याने राज्याची कोटय़वधींची हानी : मुख्यमंत्री / अनेकांना जलप्रलयात बुडण्यापासून वाचविण्यात आले यश / शेकडो लोकांच्या सुरक्षित ठिकाणी केले स्थलांतर, अन्न-पाण्याची व्यवस्था
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील 5 ते 6 तालुक्यात आलेल्या पुरामुळे एकूण सुमारे 1000 हून अधिक घरांचे मोठे नुकसान झाले असून शेकडो लोकांना पुराच्या संकटातून वाचवून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या पुराच्या तडाख्याने कोटय़वधीची हानी झाली असून धारबांदोडा येथे एक महिला बुडाल्याने मृत्यूमुखी पडली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली, तथापि त्या मृत्यूची अद्याप खात्री पटली नसल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की गेल्या 8 दिवसापासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे सत्तरी, डिचोली, बार्देश, पेडणे, धारबांदोडा, सांगे, काणकोण या तालुक्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक मातीची घरे कोसळली असून लोक बेघर झाले आहेत. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या पथकांनी दिलेल्या तपशीलानुसार तयार केलेला अहवाल डॉ. सावंत यांनी वाचून दाखवला.
सात तालुक्यांना जबर फटका
पेडणे तालुक्यात 88 घरांचे नुकसान झाले असून 8 जणांना पुरातून वाचवण्यात आले. बार्देशमध्ये 167 घरांना पुराचा फटका बसला असून 9 जणांना पुरातून बाहेर काढण्यात आले. डिचोलीत 164 घरांना हानी पोहोचली असून 40 जणांना पुराच्या संकटातून वाचवण्यात आले. सत्तरी तालुक्यात 130 घरांना बाधा झाली असून 65 जणांना पुरातून वाचवण्यात यश आले आहे. सांगे तालुक्यात 184 घरांना पुराचा फटका बसला असून 84 लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. काणकोणमध्ये सुमारे 60 लोकांना पुरातून बाहेर काढण्यात आल्याचे डॉ. सावंत म्हणाले. धारबांदोडा तालुक्यात 135 घरांचे नुकसान होऊन 150 लोकांना वाचवण्यात आले आहे.
शेकडो लोकांचे केले स्थलांतर
पुरातून वाचवण्यात आलेल्याची व्यवस्था जवळपासच्या सरकारी शाळेत- हॉलमध्ये करण्यात आली असून त्यांचा खाण्या- पिण्याची योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश संबंधित उपजिल्हाधिकाऱयांना दिल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
तिसवाडी, सासष्टी, केपे बचावले
सालसेत, तिसवाडी, केपे व इतर तालुक्यांना पुराचा फटका बसला नाही. फोंडा तालुक्यात उसंगाव, वाघुर्मे भागात मोठे नुकसान झाले असून दुकाने- घरे बुडाली- कोसळली आहेत. आपल्या डोळ्यादेखत अनेक घरे जमीन दोस्त झाल्याचे ते म्हणाले.
राज्याचे कोटय़वधींचे नुकसान आपल्या महितीनुसार 1982 मध्ये असा पुर आला होता व तो आपण पाहिला होता. त्याची आठवण करुन ते म्हणाले की त्यानंतर आता हा तसाच पूर आल्याचे त्यांनी सांगितले. या पुरात राज्याचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले असून त्याची गणतीच करता येणार नाही. नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरु असून लोकांना मदत करण्याचे कामही चालू आहे असेही ते म्हणाले.









