- पिण्याच्या पाण्याची कामे दर्जेदार करा!
- जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांचे आदेश
प्रतिनिधी / ओरोस:
जलजीवन अंतर्गत कुटुंबांना नळजोडणी दिली जाणार आहे. या योजनेनंतर सुमारे 15 ते 20 वर्षे पाण्यासाठी तक्रार करता येणार नाही. त्यामुळे जलजीवनची कामे दर्जेदार करा. जलस्वराज्य योजनेप्रमाणे फसगत होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी दिले.
जलव्यवस्थापन समितीची मासिक सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती शर्वाणी गावकर, अंकुश जाधव, महेंद्र चव्हाण, डॉ. अनिषा दळवी, सदस्या श्वेता कोरगावकर, स्वीकृत सदस्य प्रमोद कामत, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे व अधिकारी उपस्थित होते.
जलजीवन अंतर्गत 68 हजार 13 कुटुंबांना नळजोडणी दिली जाणार आहे. यामध्ये जुन्या 520 योजना असून त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. तर 190 महसुली गावांमधून नवीन कामे केली जाणार आहेत.
दरम्यान, 13 कोटी 91 लाखाची 73 कामे मंजूर झाली आहेत. यामध्ये मालवण तालुक्यातील नऊ कामांसाठी 1 कोटी 73 लाख, वेंगुर्ल्यात 15 कामांसाठी 5 कोटी 73 लाख, कुडाळ नऊ कामांसाठी 1 कोटी 57 लाख, कणकवली 11 कामांसाठी 1 कोटी 4 लाख, वैभववाडी 7 कामांसाठी 51 लाख, सावंतवाडी 11 कामांसाठी 1 कोटी 54 लाख, देवगड नऊ कामांसाठी 1 कोटी 26 लाख, दोडामार्ग दोन कामांसाठी 96 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. ही कामे दर्जेदार करण्याचे आदेश सावंत यांनी दिले.
वीज देयक थकित राहिल्यास वीज कंपनी संबंधित ग्रामपंचायतीच्या अन्य कामांना परवानगी देत नाही. त्याचप्रमाणे देवगड नळपाणी योजनेची पाणीपट्टी वसूल होत नसेल तर त्यांच्याबाबत आता जि. प. नेही असहकार्याचे धोरण स्वीकारावे. अन्य निधी थांबवावा. तो वळता करून घ्यावा, याकडे उपाध्यक्ष म्हापसेकर यांनी लक्ष वेधले. तर आता केवळ नोटीस न देता पुढील कारवाई करण्याचे आदेश अध्यक्षा सावंत यांनी दिले.
रेडी येथील बराचसा भाग मायनिंगचा असल्याने या भागातील पाणी कायमच दूषित होते. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी या ठिकाणचे दूषित पाणी नमुने संकलन वाढविण्याचे आदेश देण्यात आले. तसेच बांदा-दोडामार्ग रस्त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाईपलाईनसाठी खोदलेले खड्डे तात्काळ बुजवावेत, असे आदेशही सावंत यांनी दिले. दोडामार्ग तालुक्यातील काही कामे निधीअभावी नामंजूर केल्याचे निदर्शनास आणून देत अंकुश जाधव यांनी या प्रशासकीय कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली.









