नशेत होता कारचालक : पोलिसांकडून अटक : ट्रियर शहरात दुर्घटना : 14 जखमी
वृत्तसंस्था/ ट्रियर
जर्मनीच्या ट्रियर शहरात मंगळवारी रात्री एक भरधाव कार फुटपाथवर घुसल्याने झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका बाळाचाही समावेश आहे. कारचा चालक अत्यंत नशेत होता, त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी केली जात आहे. आरोपी बऱयाच वेळापासून वाहतूक पोलिसांना चुकवून अत्यंत बेदरकारपणे वाहन चालवत होता.
दुर्घटनेवेळी ट्रियर शहरातील बाजारात मोठी गर्दी होती, लोक तेथे नाताळाच्या खरेदीसाठी बाहेर पडले होते. याचदरम्यान एक कार अत्यंत वेगाने बॅरिकेड्स तोडून फुटपाथवर घुसली. या दुर्घटनेत 3 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर दोन जणांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. या दुर्घटनेत 14 जण जखमी झाले आहेत.
51 वर्षीय आरोपी
आरोपीचे वय 51 वर्षे असून तो ट्रियर शहराचाच रहिवासी आहे. आरोपीचा वाहतूक पोलीस पाठलाग करत होते, पलायनाच्या प्रयत्नात त्याच्याकडून ही दुर्घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रियरचे महापौर वोल्फॉर्म लेवी यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त करत सणासुदीच्या काळातील ही घटना दुःखद असल्याचे म्हटले आहे. 9 महिन्याचे बाळ आणि 73 वर्षीय महिला या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. मृत बाळाच्या आईची गंभीर प्रकृती असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.









