सई मोरे अंतराळ शास्त्रज्ञ : ‘संपूर्ण जर्मनी भयकंपित!’ : ‘भारतातील नियंत्रण कौतुकास्पद!’
- आम्ही जर्मनीत असलो, तरी काळजी भारताची
- भारताला सुपर पॉवर होण्याची हीच संधी!
- अधिक सामर्थ्याने उर्वरित
लढाई जिंकावी लागेल!
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
“माझ्या देशवासीयांनो केवळ आपल्यावरच नव्हे, तर साऱया जगावरच अस्मानी संकट कोसळले आहे. पण एक लक्षात ठेवा, संकटाबरोबरच अनेक संधी देखील चालून येतात. या कोरोनाच्या प्रकोपात महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका, चीनसारखी अनेक राष्ट्रे डळमळली आहेत. अनेक विकसित राष्ट्रेही हतबल झालेली आपण पाहत आहात. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपला भारत मात्र असामान्य आत्मविश्वासाने आणि समर्थपणे कोरोनाचे हे आव्हान परतवून लावताना दिसत आहे. अविश्वसनीय अशी ही बाब आहे. सगळं जग आता भारताकडे मोठय़ा आशेने आणि अपेक्षेने पाहतंय. आपण ही लढाई जर जिंकली, तर लक्षात ठेवा. संपूर्ण जगाचे नेतृत्व आपोआपच आपल्या हाती येईल. आपला देश खऱया अर्थाने सुपर पॉवर बनेल. मात्र त्यासाठी आतापर्यंत तुम्ही जी एकजूट दाखवली, निर्धार दाखवला तो कायम ठेवा, अर्धी लढाई आपण जिंकली आहे. अर्धी लढाई अजून जिंकायची बाकी आहे. त्यामुळे अधिक जोमाने हा लढा सुरूच ठेवा.’’
हे आवाहन आहे जर्मनस्थित सिंधुदुर्गची सुकन्या व प्रसिद्ध अंतराळ संशोधक निखील उर्फ सई मोरे हिचे. कोरोनाविरुद्धच्या भारतीयांच्या म्हणजेच आपल्या देशबांधवांच्या लढय़ाला पाठिंबा देण्यासाठी तिने जर्मनी येथून ‘तरुण भारत’शी संवाद साधला.
काळजी भारताचीच
सई सध्या जर्मनीतील म्युनिक शहरापासून काही अंतरावर असलेल्या गार्सी या भागात राहते. ती यापूर्वी नेदरलँडमध्ये राहत होती. महिनाभरापूर्वीच ती जर्मनीमध्ये शिफ्ट झाली. अंतराळ संशोधन करणाऱया जर्मनीतील ‘मॅक्स प्लांक इन्स्टिटय़ूट’ या जगप्रसिद्ध संस्थेत ती ‘स्पेस सिस्टम इंजिनियर’ म्हणून काम करते. कोरोनाच्या संकटामुळे इतरांप्रमाणे ती देखील चिंतेत आहे. जर्मनीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या वर पोहोचली असून मृतांचा आकडा दीड हजाराच्या पार पोहोचला आहे. या देशाची परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. सई अतिशय जागृतपणे कोरोनापासून स्वत:चा बचाव करीत आहे. तिला खरी काळजी लागून राहिली आहे ती आपल्या भारत देशाची. एक छोटीशी चूक देखील आपल्या देशाला महाग पडू शकते. पुरा देश उद्धवस्त करू शकते. त्यामुळे ती फार चिंतेत आहे.
जाग आली की सुरु होते धडधड
सई म्हणाली, सकाळी जाग आली की कोरोनाच्या आठवणीने छाती धडधडायला लागते. काय झालं असेल जगात? आपल्या भारतातील परिस्थिती काय असेल? असे अनेक प्रश्न छातीत धडकी भरवतात. त्यानंतर लगेचच नेटवर जाऊन करोना घडामोडींची जागतिक लिस्ट ओपन करून त्यावर नजर टाकते. या लिस्टवरील पहिल्या नंबरवरून नजर खाली-खाली सरकत जाते आणि अगदी शेवटच्या नंबरवर आपला देश पाहून थोडसं हायसं वाटतं. आपल्या देशाचा अभिमानही वाटतो. कोणत्याही प्रकारच्या मुबलक सेवा सुविधा नसतानाही आपल्या देशाने या संकटाला ज्या पद्धतीने रोखून धरलंय, त्याबद्दल खरोखरच आश्चर्य वाटतं. यातूनच एक आशेचा किरण दिसतो. शेवटपर्यंत भारताने हे संकट प्रभावीपणे परतवून लावले, तर आपल्या देशाची वाहव्वा साऱया जगात होईल. सारं जग भारतीय ताकद व इच्छाशक्तीपुढे नतमस्तक होईल, असे राहून-राहून वाटते’, असं ती म्हणाली.
येथील नागरिक शिस्तप्रिय
जर्मनीतील कोरोनाच्या स्थितीबाबत बोलताना ती म्हणाली, जर्मनीत कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा लाखाच्या घरात पोहोचलाय व 1584 लोक मृत्युमुखी पडले आहेत. पण अमेरिका, इटलीसारखी इकडील परिस्थिती नाही. जर्मन नागरिक शिस्तप्रिय आहेत. कायद्याचा ते आदर करतात. इकडे सर्वत्र लॉकडाऊन केलं आहे. 14 मार्चपासून देशात लॉकडाऊन जाहीर केलंय. पब्लिक ट्रान्स्पोर्ट सुरू आहे. मात्र बहुतांश कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असल्यामुळे बसेस्, रेल्वे गाडय़ांमधून प्रवास करणाऱयांची संख्या फारच कमी आहे. बसेसमध्ये तिकीट देणारी स्वयंचलित यंत्रे बसविली असून त्यामुळे नोटा हाताळणीतून होणारा कोरोनाचा संभाव्य प्रसार थांबला आहे. मोठमोठय़ा मॉलमध्ये देखील गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जाते. सोशल डिस्टन्ससाठी खरेदीकरिता ट्रॉली वापर कंपल्सरी केला आहे. ट्रॉलीमुळे सोशल डिस्टंन्सिंग आपोआपच होऊन जाते.
आर्थिक झळ पोहचू नये म्हणून शासनाकडून पॅकेजीस जाहीर
जर्मन सरकारनेदेखील या आणिबाणीच्या परिस्थितीत नागरिकांना आर्थिक झळ पोहोचू नये म्हणून अनेक पॅकेजीस जाहीर केली आहेत. या देशात किमान वेतनाचा कायदा आहे. प्रत्येक कर्मचाऱयाला वेतनाच्या रुपात किमान 1500 युरो मिळतात. त्यामुळे या देशात गरिबी नाहीच. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आर्थिक झळ पोहोचलेली नाही. कितीही कठीण परिस्थिती आली, तरी कोणत्याही कामगाराला कामावरून काढायचे नाही, असे सक्त आदेश येथील सरकारने दिले आहेत. मात्र वेळ आली आणि आर्थिक आरिष्ठ मोठं आलं, तर ज्यांचे मोठे पगार आहेत, त्यांचा पगार कपात होईल, असे वाटते, असेही सई म्हणाली.
मी सुरक्षित, तुम्हीही सुरक्षित रहा!
‘भारतावरचा धोका अजूनही टळलेला नाही. 50 टक्के लढाई आपण जिंकलेली आहे. आता अधिक शिस्तीने, संयमाने आणि सामर्थ्याने उर्वरित 50 टक्के लढाई आपणास जिंकायची आहे आणि आपला देश जगात सर्वात सामर्थ्यशाली आहे, हे दाखवून द्यायचे आहे, असे ती म्हणाली. आपण या ठिकाणी सुरक्षित आहे. तुम्हीही सर्वांनी घरात बसून सुरक्षित रहा’, असे आवाहनही तिने भारतीयांना केले आहे.
कोरोना चाचण्यांचे रिपोर्ट तात्काळ
लॉकडाऊनबाबत बोलताना सई म्हणाली, ‘लॉकडाऊन काळातही इकडे युरोपमधील लगतच्या कोणत्याही देशात आपण आजही जाऊ शकतो. मात्र युरोपबाहेरील देशात जाणे वा बाहेरून येणे, ही आवक-जावक बंद करण्यात आली असल्याची ती म्हणाली. या देशात कोरोनाच्या चाचण्या त्वरित होतात. त्याचे रिपोर्ट त्वरीत मिळतात. त्यामुळे धोका वाढण्यापूर्वीच तो टाळता येतो. त्यामुळेच आपल्याकडे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या लाखाच्या घरात आहे व मृत्यू झालेल्यांची संख्या दिड हजाराच्या आत आहे’, असे ती म्हणाली.









