वृत्तसंस्था/ बर्लिन
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या हॅले खुल्या आंतरराष्ट्रीय पुरुषांच्या ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या ऍलेक्झांडर व्हेरेव्हचे आव्हान दुसऱयाच फेरीत समाप्त झाले. फ्रान्सच्या युगो हम्बर्टने त्याचा पराभव करत तिसरी फेरी गाठली.
गुरुवारी या स्पर्धेतील झालेल्या दुसऱया फेरीतील सामन्यात फ्रान्सच्या युगो हम्बर्टने व्हेरेव्हचा 7-6 (7-4), 3-6, 6-3 असा पराभव केला. या स्पर्धेत सिडेड खेळाडूत मेदवेदेव्ह, ऍग्युट, गोफीन, मोनफिल्स आणि फेडरर यांचे आव्हान यापूर्वीच समाप्त झाले आहे. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या कोर्दाने जपानच्या निशीकोरीचा 2-6, 6-3, 7-5 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. हम्बर्ट आणि कोर्दा यांच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. दक्षिण आफ्रिकेच्या हॅरीसने स्लोव्हाकियाच्या लॅकोचा 6-3, 7-6 (10-8) असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.









