वृत्तसंस्था/ लिपझिग
नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी येथे झलेल्या सामन्यात यजमान जर्मनीने युक्रेनचा 3-1 अशा गोल फरकाने पराभव केला. जर्मनीच्या विजयात टिमो वेर्नरने शानदार दोन गोल नोंदविले.
या सामन्यात जर्मनीने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळाला प्रारंभ केला पण 11 व्या मिनिटाला येरेमचूकने शानदार गोल नोंदविताना जर्मनीच्या गोलरक्षकाला हुलकावनी देत युक्रेनचे खाते उघडले. 23 व्या मिनिटाला लिऑन गोरेकाने दिलेल्या पासवर लिरॉय सॅनीने जर्मनीला बरोबरी साधून दिली. 33 व्या मिनिटाला गोरेकाने पुन्हा एकदा शानदार चाल रचत वेर्नरकडे पास दिला. वेर्नरने संघाचा दुसरा तर वैयक्तिक पहिला गोल नोंदवून जर्मनीला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत जर्मनीने युक्रेनवर 2-1 अशी बढत मिळविली होती. 64 व्या मिनिटाला वेर्नरने आपला वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल नोंदवून युवक्रेनचे आव्हान संपुष्टात आणले. कोरोनाची अनेक खेळाडूंना बाधा झाल्याने युक्रेनचा संघ कमकुवत झाला. युक्रेन संघातील चार खेळाडूंना तसेच प्रशिक्षक वर्गातील एका सदस्याला कोरोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी चांचणीमध्ये आढळून आले होते.









