वृत्तसंस्था/ सुगेनहेम
जर्मनीच्या विश्वटूर बोरा-हेन्सग्रोहे फिडर सायकलींग संघातील सदस्य 17 वर्षीय जेन रिडेमन याचे अपघाती निधन झाले. सायकलींग सरावानंतर जात असताना त्याच्या वाहनाला एका मोटारीने धडक दिली. या अपघातात रिडेमनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
विश्वटूर सायकलींग स्पर्धेसाठी 19 वर्षांखालील वयोगटातील फिडेर संघामध्ये रिडेमनचा समावेश होता. जर्मनीतील सुगेनहेम येथे रिडेमन आणि त्याच्या संघातील इतर सायकलपटू प्रशिक्षणात दाखल झाले होते. सराव संपल्यानंतर रिडेमन आपल्या निवासस्थानाकडे जात असताना त्याच्या वाहनाला मोटारीने धडक दिली. रिडेमनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला लागलीच रूग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वी डॉक्टरांनी रिडेमनला मृत घोषित केले. आंतरराष्ट्रीय सायकलींग युनियनतर्फे रिडेमनला श्रद्धांजली वाहण्यात आली.









