वृत्तसंस्था/ बर्लीन
आंतरराष्ट्रीय दर्जाचे तसेच जर्मनीच्या फुटबॉल क्षेत्रातील महान फुटबॉलपटू गर्ड मुलर याचे रविवारी वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. फुटबॉल क्षेत्रामध्ये जर्मनीकडून मुलर यांनी आंतरराष्टीय स्तरावर सर्वाधिक गोल नोंदविले आहेत.
जर्मनीतील लीग फुटबॉल स्पर्धेत अनेक वर्षे मुलर यांनी बायर्न म्युनिच क्लबचे प्रतिनिधीत्व केले. तत्कालीन पश्चिम जर्मनी संघाचे मुलर यांनी 62 आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधीत्व करताना 68 गोल नोंदविले. 1974 साली फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱया जर्मनी संघामध्ये मुलर यांचा समावेश होता. फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱया फुटबॉलपटूमध्ये मुलर 14 गोलासह तिसऱया स्थानावर आहेत. जर्मनीचा क्लोज 16 गोलासह पहिल्या तर रोनाल्डो 15 गोलासह दुसऱया स्थानावर आहे. मुलर यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर जर्मनीने 1972 साली युरोपियन फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. मुलर यांनी आपल्या वैयक्तिक 15 वर्षांच्या फुटबॉल कारकीर्दीत विविध स्पर्धांमध्ये 607 सामन्यांत 566 गोल नोंदविले आहेत. जर्मन फुटबॉल फेडरेशनतर्फे तसेच बायर्न म्युनिच क्लबचे अध्यक्ष हेंनर यांनी मुलर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.









