वार्ताहर / वाठार किरोली
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असणारा जरंडेश्वर शुगर मिल या कारखान्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर जिल्ह्यातील कोरेगाव वाई, खंडाळा, खटाव या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर्षी सुमारे 22 हजार हेक्टर क्षेत्रात उसाची नोंद या कारखान्यामध्ये झाली. येवढ्या उसाचे करायचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
यासाठी कोरेगाव येथे तहसीलदार कार्यालयावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चात शेतकाऱ्यांसोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि बहुतांश राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते सामील झाले होते. त्यामुळे हा मोर्चा शेतकऱ्यांचा नसून राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याचे कोरेगावमध्ये बोलले जात होते. जरंडेश्वर कारखाना पूर्ववत सुरू ठेवावा, या मागणीचे निवेदन कोरेगाव तहसीलदारांना देण्यात आले. मोर्चा दरम्यान कोरेगावमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे कोरेगाव शहराला छावणीचे स्वरूप आले होते.