प्रतिनिधी / सातारा :
जरंडेश्वर कारखान्याने पूर्वीचे कर्ज हे जिल्हा बँकेकडून घेतले नव्हते. आम्ही आताचे 100 कोटींचे कर्ज एक्स्पॉशनसाठी दिले होते. ते कर्ज नियमानुसार दिले गेले आहे. कर्ज मंजूरीचा विषय ज्या सभेत झाला. त्या सभेला संचालक म्हणून खासदार उदयनराजेंची हजेरी होती. त्यांनी त्यावेळी का विरोध केला नाही. त्यांची सही प्रोसिडिंगवर आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवेंद्रराजेंनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, जिल्हा बँकेच्या मेडिक्लेमचा प्रिमियम विमा कंपन्यांनी कमी केला नाही. तेवढे पैसे भरले असते तर पुन्हा हेच म्हणाले असते बँकेच्या सभासदांच्या पैशाची उधळपट्टी केली म्हणून. मेडिक्लेमच्या प्रियिमयचे काम अंतिम टप्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हा बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत आमदार शिवेंद्रराजे बोलत होते. ते म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांच्या हितासाठी सभासदांच्या फायद्याची मेडिक्लेम योजना सुरु केली आहे. त्याचा प्रिमीयम विमा कंपन्यांनी जास्त सांगितला होता. तेवढा प्रिमियम बँकेला भरणे परवडणारा नव्हता. म्हणून विमा कंपनीशी बोलणे सुरु होते. त्यांचा कोटा जास्त होता. 103 कोटी भरा म्हणत होते. एवढे पैसे भरले तर पुन्हा हीच मंडळी सभासदांच्या पैशांची उधळपट्टी केली म्हणून आरोप करतील. ते काम अंतिम टप्यात आले आहे, असे स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले, जरंडेश्वर कारखान्याला पूर्वी कर्ज जिल्हा बँकेने दिले नव्हते. कारण त्यांनी मागणी केली नव्हती. आता दिलेले कर्ज हे नाबार्ड आणि आरबीआयच्या निकषानुसार आहे. दिलेल्या कर्जाचे हप्ते कुठेही थकले नाहीत. वेळेवर हप्ते फेडले जात आहेत. दिलेले कर्ज हे कारखान्याच्या एक्स्पॉशनसाठी दिले गेले आहे. हे कर्ज देण्याचा विषय ज्या मासिक सभेत झाला त्या मासिक सभेला स्वतः उदयनराजेंची हजेरी होती. त्यांची सही प्रोसिडिंगवर आहे. त्यावेळी तुम्ही का विरोध केला नाही. जे आहे ते आहे. ज्यांना मतदारांची साथ नाही. त्यांना पराभव समोर दिसतो आहे. म्हणून आरोप सुरु आहेत. जरंडेश्वर कर्ज प्रकरणाची माहिती द्यायला आमचा कुठे नकार आहे, अशीही टीप्पणी त्यांनी केली.









