-चंद्रकांतदादा पाटील, संपतबापू पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती, -संस्थापक शिवाजीराव माने यांची माहिती
प्रतिनिधी/कोल्हापूर
जय शिवराय किसान संघटनेच्या तिसऱ्या वर्धापनादिना निमित्त भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. सोमवार 11 रोजी दुपारी दोन वाजता पेठ वडगाव- वाठार रोडवरील इरा हॉल येथे हा मेळावा होणार आहे मेळाव्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार संपतबापू पवार- पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. मेळाव्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात विचार मंथन केले जाणार आहे. अशी माहिती जय शिवराय किसान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
माने म्हणाले, एकरक्कमी एफ.आर.पी. कुठल्याही परिस्थितीत मोडू दिली जाणार नाही. 2019 पेक्षा या वर्षी पुराची तीव्रता जास्त होती. शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्याप नदीकाठचा वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे आलेले संकट, त्यातच यंदा आलेला महापूर यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. जिल्हय़ातील कारखानदारांनी एफ.आर.पी. पेक्षा दोनशे रुपये जास्त द्यावेत, अशी आमची मागणी आहे. नीती आयोगाच्या शिफारशी वरून एफ.आर.पी. तीन टफ्फ्यात करण्याचा घाट घातला जात आहे. या अनुषंगाने शेती प्रश्नावर समग्र चर्चा करण्यासाठी, भा†वष्यात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.
महापुराबाबत कोणती ठोस भूमिका घेतली पाहिजे, दूध भाजीपाला सोयाबीन भुईमूग, नाचणी मका या पिकांना रास्त भाव मिळण्यासाठी कोणती व्यूहरचना असली पाहिजे यावरही या मेळाव्यात विचारमंथन होणार असल्याचे माने यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात शेतमजुरांच्या हाताला काम मिळाले नाही. यासाठी सरकारने शेतमजूर महामंडळ स्थापन करावे. शेतमजुरानाही पेन्शन मिळावी व सरकारने शेतमजुरांचा आरोग्य विमा उतरावा, यासह शेतमजुरांच्या इतर मागण्यासाठी या मेळाव्यातून सरकारकडे मागण्या करण्यात येणार असल्याचे माने यांनी संगितले.
या मेळाव्यासाठी वीजतज्ञ प्रताप होगाडे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, नाशिकचे शेतकरी चळवळीतील जेष्ठ नेते दशरथ सावंत, मराठवाडय़ातील लढवय्ये नेते माणिक कदम, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे. बळीराजा पार्टीचे बी. जी. पाटील काका यांच्यासह शेती क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी सदाशिव कुलकर्णी, उत्तम पाटील, बंडा पाटील, शितल कांबळे, शिवाजी शिंदे, नारायण थोरवत, रामदास वडड, प्रल्हाद पाटील, बाजीराव पाटील, दत्ता पाटील, गब्बर पाटील, अमोल चव्हाण, युवराज आडनाईक, सुनील कांबळे उपस्थित होते.