कुडाळमध्ये राष्ट्रवादीने केला निषेध
वार्ताहर / कुडाळ:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी येथे करून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच भाजप व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून संताप व्यक्त करण्यात आला.
मोदींवरील या पुस्तकाविरोधात देशभरासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी तीव्र पडसाद उमटले. कुडाळात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कुडाळ-उद्यमनगर येथे मुंबई-गोवा महामार्गानजीक लेखक जयभगवान गोयल यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी दहन करून निषेध केला.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, कुडाळ तालुकाध्यक्ष भास्कर परब, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, सामाजिक न्याय विभाग सरचिटणीस चंद्रकांत पाताडे, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष नझीर शेख, महिला तालुकाध्यक्षा पूजा पेडणेकर, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सावळाराम अणावकर, तालुका सरचिटणीस प्रसाद पोईपकर, उपाध्यक्ष साबा पाटकर, डॉ. अभिनंदन मालणकर, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, शहर अध्यक्ष संग्राम सावंत, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत, बाबी सावंत, अशोक कांदे, कृष्णा बिबवणेकर, अशोक खेमा सावंत, दत्तात्रय कदम, नरेश कदम, आनंद पाटकर, विनायक हादगे, बाळा सातार्डेकर, महेश कदम, साबाजी सावंत, योगेश माळकर, अनिल कानडे आदी उपस्थित होते.
‘शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱया गोयल यांचा निषेध असो’, ‘केंद्र सरकार हाय-हाय’, ‘नरेंद्र मोदी हाय-हाय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो’, अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. दरम्यान, काहीवेळाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड यांनी तेथे जात कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घेतली.









