12 किलो आरडीएक्स जप्त; राजस्थानमध्ये 3 दहशतवाद्यांना अटक : सर्व ‘सुफा’ संघटनेचे सदस्य
जयपूर / वृत्तसंस्था
जयपूर शहराला साखळी बॉम्बस्फोटांनी हादरवण्याचा मोठा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळला आहे. राजस्थान पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी मध्यप्रदेशातील सुफा संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना चित्तोरगडच्या निंबाहेरा येथून अटक केली. त्यांच्या कारमधून बॉम्ब बनवण्याचे साहित्य, टायमर आणि 12 किलो आरडीएक्स जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांनी आरडीएक्स आणि बॉम्ब बनवण्याची उपकरणे त्यांच्या साथीदारांकडे हस्तांतरित करण्याची योजना आखली होती. स्थानिक साथीदारांकडे हे साहित्य पोहोचवल्यानंतर जयपूरमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट त्यांनी आखला होता.
आरोपी निंबाहेरा येथे बॉम्ब बनवून दुसऱया टोळीला देणार होते, जे जयपूरमध्ये तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणार होते. हा कट अंमलात आणण्याआधीच पोलिसांनी संशयितांना पकडले. देशद्रोहाच्या प्रकरणात कुख्यात सुफा संघटना 2012-13 मध्ये मध्यप्रदेशातील रतलाममध्ये सक्रिय झाली. अनेक वर्षे शांत राहिल्यानंतर ही दहशतवादी संघटना पुन्हा दहशतवादी हल्ल्याच्या कारवायांमध्ये सक्रिय झाल्याचे समजते.
जुबेर, अल्तमास आणि सरफुद्दीन उर्फ सैफुल्ला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते रतलाम येथून पसार होऊन निंबाहेराजवळील राणीखेडा येथे राहत होते. राजस्थानमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांच्या माहितीवरून रतलाम येथूनही दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवाद्यांची चौकशी करण्यासाठी उदयपूर आणि जयपूर एटीएसचे पथक गुरुवारी संध्याकाळी उशिरा निंबाहेरा येथे पोहोचले. त्यांची चौकशी करण्यासाठी मध्यप्रदेशची एटीएस टीमही सहभागी झाली आहे.
स्लीपर सेलप्रमाणे ‘सुफा’चे काम
सुफा ही कट्टरपंथी विचारसरणीच्या 40-45 तरुणांची इस्लामिक संघटना आहे. हे दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलप्रमाणे काम करते. ही संघटना समाजातील मूलगामी विचार आणि पद्धतींची पुरस्कर्ती आहे.