वृत्तसंस्था/ बेंगळूर
आठव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील रविवारी येथे झालेल्या 82 व्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने पाटणा पायरेट्सचा 51-30 अशा गुणांनी मोठा पराभव केला. तर दुसऱया एका सामन्यात तामीळ थलैवाजने बेंगळूर बुल्सवर 42-24 अशी मात केली.
जयपूर आणि पाटणा यांच्यातील सामन्यात जयपूर पिंक पँथर्स संघातील अर्जुन देशवालने दर्जेदार कामगिरी करताना 17 गुण तर दीपक हुडाने 8 गुण नोंदविले. बचावफळीतील संदीप धुल आणि विशाल यांनी प्रत्येकी 5 गुण नोंदविले. पाटणा पायरेट्स संघाने यापूर्वी ही स्पर्धा तीनवेळा जिंकली आहे पण रविवारच्या सामन्यात जयपूर संघातील खेळाडूंनी पाटणा संघाच्या बचावफळीवर शेवटपर्यंत दडपण राखले होते. जयपूर संघाने आठव्या मिनिटाला पाटणा संघाचे पहिल्यांदा सर्वगडी बाद करून 9 गुणांची आघाडी घेतली. अर्जुन देशवालने सुपर 10 गुण मिळविले. मध्यंतरापर्यंत जयपूर संघाने पाटणा संघावर 25-11 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धातील खेळाच्या सातव्या मिनिटाला जयपूर संघाने पाटणा संघाचे दुसऱयांदा सर्व गडी बाद करून 19 गुणांची आघाडी माळविली. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना जयपूरने 20 गुणांची आघाडी घेतली होती. अखेर जयपूर संघाने हा सामना 21 गुणांच्या फरकाने जिंकला.
बेंगळूर बुल्स आणि तामीळ थलैवाज यांच्यातील सामना एकतर्फी झाला. तामीळ संघाने हा सामना 42-24 अशा 18 गुणांच्या फरकाने जिंकला. तामीळ संघातील अजिंक्य पवारने सुपर 10 गुण तर मनजीतने 8 गुण नोंदविले. या सामन्यात बेंगळूर संघाचा कर्णधार पवन सेहरावत याची कामगिरी म्हणावी तशी उठावदार झाली नाही. 13 व्या मिनिटाला बेंगळूर संघाचे पहिल्यांदा सर्वगडी बाद झाल्याने तामीळ संघाने 5 गुणांची आघाडी मिळविली होती. मध्यंतरावेळी तामीळ संघाने बेंगळूरवर 21-8 अशी भक्कम आघाडी मिळविली होती. सामना संपण्यास 9 मिनिटे बाकी असताना बेंगळूर संघाचे तिसऱयांदा सर्वगडी बाद झाल्याने तामीळ संघाने 20 गुणांची आघाडी मिळविली होती.









