काही घरांत पहाटेच पाणी, साहित्य हलवण्यासाठी धावपळ
प्रतिनिधी / कोल्हापूर :
रात्रभर सुरू असलेल्या संततधारेने जयंती नाल्याचा प्रवाह ओव्हरफ्लो झाला, अन् पहाटे शाहूपुरी कुंभार गल्लीतील काही घरांत पाणी शिरले. त्यामुळे पहाटेपासून या घरांतील साहित्य हलवण्यास सुरूवात झाली. पावसामुळे जयंती ओढÎाच्या काठावरील रामानंदनगर परिसरातील काही घरांतही पाणी शिरले.
शहर परिसरात रात्रभर सुरू असलेल्या पावसाने गुरूवारी सकाळीही हजेरी लावली. पावसाचा वाढलेला जोर अन् त्यामुळे छोटे नाले ओव्हरफ्लो झाले, हे पाणी जयंती नाल्यात आल्याने हा प्रवाह वाढत गेला. शाहूपुरी कुंभार गल्लीत असलेल्या संरक्षक भिंतीतून हे पाणी शेजारील घरांत पहाटे पोहोचले. त्यामुळे घरातील साहित्य हलवण्यासाठी अनेक कुटुंबांशी सकाळी 10 वाजेपर्यत धडपड सुरू होती. येथील सुमारे 15 घरांत पाणी शिरले आहे. येथील गणेशमुर्ती तातडीने अन्यत्र हलवल्या. तसेच केळीचे रॅकही याच पाण्यातून बाहेर काढण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन पथकाने येथे भेट दिली. जयंती नाल्याचे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने शाहूपुरी कुंभार गल्लीसह काठावरील अनेक उपनगरांत ही स्थिती पहायला मिळाली.