नवेखेड येथे जयंतरावांचे आगळे वेगळे फोटोसेशन
प्रतिनिधी / इस्लामपूर
लाईट्स… कॅमेरा… स्माईल… असा कोणताही बडेजाव नसणारा अत्यंत साधा मात्र आगळा वेगळा फोटोशूट आज सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नवेखेड येथे पार पडला. फोटोग्राफर होते ते ६ वर्षीय नवेखेड येथे राहणारे रुद्र सागर जंगम तर मॉडेल होते राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत राजाराम पाटील.
त्याच असं झाले की आपल्या रोजच्या नियमाप्रमाणे मंत्री जयंत पाटील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आपल्या मतदारसंघात दौऱ्यावर होते. वाळवा तालुक्यातील नवखेड येथे मंत्री महोदयांचा ताफा पोहोचताच रुद्र सागर जंगम हा चिमुकला, मंत्री जयंतरावांकडे गेला आणि म्हणाला. “साहेब मला आपला फोटो काढायचा आहे” मंत्री जयंत पाटील यांनाही त्याचे कौतुक वाटले आणि त्यांनी होकार दिला. मग काय गड्याने जो काढला त्याला दाद देण्याशिवाय मंत्री महोदयांनाही राहवलं नाही. आणि बरं का रुद्र जंगम यांना मंगलाष्टकाही तोंडपाठ आहे. फोटोसेशन संपताच लागलीच गड्याने मंत्री महोदयांना मंगलाष्टकाही म्हणून दाखवली आणि मंत्री महोदयांसह उपस्थितांची वाह वाह मिळवली.
राजकारणात चेहरा फार महत्वाचा. ज्या पक्षाकडे चेहरे त्याच पक्षाला सर्वाधिक मते हे जणू समीकरणच. फ्लेक्सवर रुबाब मोठा असलाच पाहिजे अशी नेत्यांची इच्छा असते त्यासाठी वारेमाप खर्च केला जातो. मात्र इस्लामपूरात पार पडलेले हे आगळे वेगळे फोटोसेशन ह्रदयाला भिडणारे आहे यात शंकाच नाही.








