ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात शांतता भंग करण्यासाठी मंदिरावर ग्रेनेड हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट पोलिसांनी रविवारी उधळून लावला. याप्रकरणी तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडील 6 ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. पुंछचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक रमेशकुमार अग्रवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली.
अग्रवाल म्हणाले, पाकिस्तानातील एका म्होरक्याच्या सांगण्यावरून पुंछ जिल्ह्यातील एका मंदिरावर हे दहशतवादी ग्रेनेड हल्ला करणार होते. मेंढर सेक्टरमधील बसूनीजवळ एका वाहनाची तपासणी करताना या कटाची पोलिसांना कुणकुण लागली. त्यानुसार पोलिसांनी 49 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांबरोबर मुस्तफा इक्बाल आणि मुर्तजा इक्बाल या दोन भावांना अटक केली.
चौकशीअंती अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींनी कटाची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला अटक करण्यात आली असून, हे दहशतवादी पाकिस्तानशी संबंधित आहेत.









